Nagpur Accident – नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील खाण आणि औद्योगिक स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या कारखान्यात रविवारी सकाळी झालेल्या शक्तिशाली स्फोटात किमान १७ जण ठार आणि १८ जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या माहीतीनुसार, हा स्फोट इतका भयानक होता की, मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले आहेत आणि मृतांची ओळख पटविण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात येत होते. पीडितांच्या असह्य कुटुंबीयांनी त्यांच्या प्रियजनांच्या माहितीसाठी कारखान्याच्या परिसरात गर्दी केली होती. पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (पीईएसओ) आणि संरक्षण माहिती प्रणाली (डीआयएसएस) च्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. स्फोटानंतर जखमींना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोदार घटनास्थळी होते. एसबीएल एनर्जी लिमिटेडच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ही घटना कंपनीच्या डेटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये सकाळी ७ ते ७.१५ च्या दरम्यान घडली, त्यावेळी कोणतेही सक्रिय उत्पादन कार्य सुरू नव्हते. नेमके कारण अध्याप समोर आले नाही. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. अंतर्गत आढावा सुरू करण्यात आला आहे आणि तपासाच्या निष्कर्षांवर आधारित योग्य सुधारणात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जातील. बाधित कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्व आवश्यक मदत सुनिश्चित करणे ही प्राथमिकता आहे. स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कंपनी तातडीने आर्थिक मदत देत आहे आणि जखमींच्या वैद्यकीय उपचारांचा संपूर्ण खर्च उचलत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.