नागपुरात माणुसकीचा खून..! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेहण्याची वेळ, हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल…

Nagpur accident : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी एका भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर, मदतीसाठी कोणीही पुढे न आल्याने हतबल पतीला पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून घरी न्यावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, माणुसकीच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृतक महिलेचे नाव ग्यारसी अमित यादव असून, तिचा पती अमित भुरा यादव (वय ३५) याने हा कठोर निर्णय घेतला. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात घडली.
नेमकं काय घडलं?
अमित आणि ग्यारसी रक्षाबंधनानिमित्त लोणारा येथून करणपूरला मोटारसायकलवरून जात होते. मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला कट मारला, ज्यामुळे ग्यारसी रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
अमितने हात जोडून वाहनचालकांना आणि रस्त्यावरील लोकांना मदतीची विनवणी केली, परंतु कोणीही थांबले नाही. हताश आणि दुखाने तुटलेल्या अमितला शेवटी पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून मध्यप्रदेशातील सिवनी येथील घरी नेण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मृतदेह घेऊन जाताना काही लोकांनी अमितला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु भीती आणि सदम्यामुळे तो थांबला नाही. अखेर महामार्ग पोलिसांनी मोरफाटा परिसरात त्याला अडवले आणि ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.
दशकभराचा सहवास
अमित आणि ग्यारसी गेल्या १० वर्षांपासून नागपूरच्या लोणारा परिसरात राहत होते. रक्षाबंधनाच्या शुभदिनी त्यांना त्यांच्या गावी, सिवनीला जायचे होते. मात्र, नियतीने त्यांच्यासमोर असा कठोर प्रसंग आणला की, अमितला आपल्या पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीवर बांधून न्यावा लागला.
माणुसकीवर प्रश्नचिन्ह
या घटनेने समाजातील माणुसकीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्त्यावरून जाणारे अनेक वाहनचालक आणि लोक असूनही कोणीही अमितच्या मदतीसाठी पुढे आले नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. “ही घटना माणुसकीला लाज आणणारी आहे. समाजात अजूनही संवेदनशीलता जिवंत आहे का?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांचा तपास
महामार्ग पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे. ग्यारसीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.





