नागपूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी न्यायालयामध्येच राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. न्यायमूर्ती देव यांनी त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट केलेले नाही. देव यांच्या निवृत्तीला अद्याप एक वर्ष बाकी आहे त्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शुक्रवारी न्यायमूर्ती रोहित देव नियमितपणे कामावर आले होते. त्यांनी सर्व कामकाज देखील पूर्ण केले मात्र त्यानंतर त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. यावेळी कोर्ट रूममध्ये अनेक वकील आणि इतर मंडळी देखील उपस्थित होती. देव यांचा निर्णय ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. .
गेल्या वर्षी न्यायमूर्ती देव यांनी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा यांची कथित माओवादी संबंधांच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर देव यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं होत. न्यायमूर्ती देव यांनी महाराष्ट्र सरकारच्या ३ जानेवारीच्या शासन निर्णयाच्या (जीआर) अंमलबजावणीला स्थगिती दिली होती.
राजीनामा देताना देव यांनी उपस्थित वकिलांना चांगला अभ्यास आणि कठोर परिश्रम करत राहण्यास सांगितले. तसेच देव यांनी अनेकदा घेतलेल्या कठोर भूमिकांबाबत देखील दिलगिरी व्यक्त केली. तसेच मी माझ्या स्वाभिमानाविरोधात काम करू शकत नाही असंही देव यावेळी म्हणाले.
न्यायमूर्ती देव यांची जून 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि डिसेंबर 2025 मध्ये ते निवृत्त होणार होते. उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये महाराष्ट्र सरकारचे महाधिवक्ता म्हणून काम पाहिले होते.