नगर : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आलेल्यांना उद्धटपणाची वागणूक !

अर्ज स्वीकृती केंद्राची पडताळणी करण्याची गरज
नेवासा – सध्या विशेष समाज कल्याण विभागात जात पडताळणीसाठी कार्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांसह इतरांना या कार्यालयातील अर्ज स्वीकृती विभागातील संबंधित महिला कर्मचारी अतिशय उद्धटपणे वागणूक देत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या कार्यालयाबाहेर जातपडताळणीतील कागदपत्रे वर्गवारीनुसार लावण्यासाठी व छायांकित प्रती साक्षांकित करण्यासाठी एका व्यक्तीला चक्क पन्नास रुपये मोजावे लागत आहेत. या कार्यालयातील अर्ज स्वीकृती कक्षातच कामानिमित्त आलेल्या जनतेला हकनाक त्रास व वैताग होत असून अनेक जणांनी याबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.
अहमदनगर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती राज्यात प्रथम आलेली आहे. या कार्यालयात जातपडताळणी कामी आलेल्या व्यक्तींना अर्ज स्विकृती कक्षात असलेल्या संबंधित महिला कर्मचारी उद्धटपणाची वागणूक देत आहे. आलेल्या व्यक्तींना व्यवस्थित सल्लाही देत नसल्यामुळे अर्ज स्वीकृती केंद्रातच अनेकांची या महिला कर्मचाऱ्यांबरोबर चांगलीच खडाजंगी होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकृती केंद्र कामानिमित्त आलेल्या व्यक्तींना कशी वागणूक दिली जाते ? याचीच पहिली पडताळणी करण्याची मागणी कोपरगाव, नेवासा व श्रीरामपूरहून आलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीधारकांनी केली आहे.
बाहेर जाऊन विचारा
विशेष समाजकल्याण विभागातील जात प्रमाणपत्र अधिस्वीकृती केंद्रात पन्नास, शंभर किमी लांबून आलेल्या लोकांना या कक्षात व्यवस्थित सल्ला न देता कागदपत्रे हातात देऊन बाहेर विचार म्हणून सांगितले जात आहे. कार्यालयातील कर्मचारीच व्यवस्थित बोलणार नसेल? तर बाहेर कोण सांगणार, असा संतप्त सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे





