Nagar : दूध उत्पादकांचे अनुदान जमा करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

श्रीरामपूर : दूध उत्पादकांचे थकलेले अनुदान तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला.
अनेक संकटांना तोंड देऊन मोठ्या कसोटीने दूध उत्पादक हा आपला व्यवसाय करत आहे. सरकारने जाहीर केलेले अनुदान अद्याप जमा केलेले नाही. एकीकडे मागील काही वर्षात दुधाच्या कमी दरामुळे दूध उत्पादक अडचणीत होता आणि आता दुसरीकडे जमा न झालेले अनुदान अशा अनेक संकटांना दूध उत्पादक सध्या सामोरे जात आहे.
शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. जास्तीत- जास्त उत्पादक हे शेतकरी बांधव आहे. एकीकडे न केलेली कर्जमाफी, पिकांना न दिलेला हमीभाव आणि आता दूध उत्पादकांचे देखील अनुदान सरकारने रोखले अशा चहुबाजूने बळीराजा अडचणींचा सामना करत आहे.
तातडीने दूध उत्पादकांचे थकलेले अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार ओगले यांनी दिला आहे. आमदार ओगले यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा तसेच दूध उत्पादकांना वाचविण्यासाठी जास्तीत-जास्त अनुदान द्यावे, अशी मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सरकारकडे केली होती.





