Pune District : दूध उत्पादकांसाठी मोफत पशु आरोग्य शिबिर

कात्रज दूध संघाचा जिल्ह्यात उपक्रम
तळेगाव ढमढेरे – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज पुणे यांच्या वतीने जिल्ह्यात मोफत पशु आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ही शिबिरे पुणे जिल्ह्यात राबवली जात आहेत.
शिबिरांमध्ये दूध उत्पादकांच्या जनावरांची तपासणी करून आजारांचे निदान केले जात आहे. तसेच, जंतनाशक आणि गोचीडनाशक औषधे संघाकडून मोफत वाटप केली जात आहेत. याव्यतिरिक्त, कात्रज पशुखाद्य (कात्रज १०, २०, २० प्लस, कात्रज काल्फ स्टार्टर), कडबा कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन, मिनरल मिक्सर, चारा बियाणे, मुरघास बँग, कृत्रिम रेतन सुविधा, पशुवैद्यकीय औषधे, आयव्हीएफ सेवा, जंतनिर्मूलन, स्वच्छ दूध उत्पादन आणि सेंद्रिय खते यांसारख्या विविध सेवा-सुविधांची माहितीही शेतकऱ्यांना दिली जात आहे.
संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी या शिबिरांमुळे दूध उत्पादन वाढेल आणि जनावरांमधील जंत-गोचीड समस्येचे निर्मूलन होईल, असे सांगितले. संघाचे चेअरमन ॲड. स्वप्नील ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात ३ पथके तयार करण्यात आली असून, ६५ दूध उत्पादक संस्थांमधील शेतकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्याचा मानस आहे.
कात्रज पशुखाद्य, कडबा कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन, मिनरल मिक्सर, चारा बियाणे, मुरघास बँग, कृत्रिम रेतन सुविधा, पशुवैद्यकीय औषधे, आयव्हीएफ सेवा, जंतनिर्मूलन, स्वच्छ दूध उत्पादन आणि सेंद्रिय खते याबद्दलही माहिती दिली जात आहे.
अजित पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ दूध उत्पादक संस्थांमधील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्याचा आमचा मानस आहे. या शिबिरांमुळे दूध उत्पादकांना त्यांच्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेता येईल आणि दुग्धोत्पादन वाढीस मदत होईल. शिबिरांमध्ये जनावरांची आरोग्य तपासणी, आजारांचे निदान, जंतनाशक आणि गोचीडनाशक औषधांचे मोफत वाटप केले जात आहे. मी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना या शिबिरांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन करतो, जेणेकरून त्यांना दुग्धोत्पादनातील बारकावे समजून घेता येतील आणि स्वच्छ दूध उत्पादनासाठी प्रेरणा मिळेल.”
– ॲड. स्वप्नील ढमढेरे, चेअरमन, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ मर्यादित.





