पुणे जिल्हा | दूध उत्पादकांचे पाच रुपये अनुदान कागदावरच?

वाल्हे, (वार्ताहर) – राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना खासगी व सहकारी दूध संघ 30 रुपये प्रतिलिटर दर व राज्य सरकार पाच रुपये अनुदान, असे एकूण प्रतिलिटर 35 रुपयांची दराची घोषणा शासनाकडून जून महिन्यात करण्यात आली होती.
मात्र, ऑक्टोबर महिना सुरू होऊन एक आठवडा उलटला तरी अद्यापपर्यंत 1 जुलै पासूनचे प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान,
खासगी दूध संघाकडून अद्यापपर्यंत दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात आले नसल्याने शासनाकडून घोषणा होऊन 4 महिन्यांचा कालावधी संपत आला तरी देखील आजअखेर खासगी दूध संघाला दूधपुरवठा करणारे, दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.
राज्य शासनाकडून 1 जुलै पासून दूध उत्पादक शेतकर्यांना पाच रुपये प्रतिलिटर अनुदानाची घोषणा केली होती. दरम्यान, काही सहकारी दूध उत्पादक संघाकडून, काही दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्यांतील दूध अनुदान रक्कम वर्ग केली आहे.
मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांतील दूध अनुदान रक्कम सहकारी दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात वर्ग केली नसल्याने दसरा, दिवाळी साजरी करताना आर्थिक चणचण जाणवणार असल्याचे दूध उत्पादक शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे.
दूध उत्पादक शेतकर्यांना जुलै ते सप्टेंबर महिन्यांपर्यंत प्रतिलिटर 30 रुपये दर मिळत असून त्यामध्ये उत्पादन खर्च वाढल्याने दूध व्यवसाय परवडत नाही. पशू खाद्यांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकर्यांना पारंपरिक व्यवसायावर काडीमोड करण्याची वेळ आली आहे.
राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना खासगी व सहकारी दूध संघ प्रतिलिटर 30 रुपये व राज्य सरकार 5 रुपये अनुदान असे एकूण 35 रुपये दर सरकारने जाहीर केला
मात्र, पाच रुपये दूध अनुदानाची खासगी दूध संघाला दूधपुरवठा करणा-या तसेच काही सहकारी दूध संघाला दूधपुरवठा करणार्या शेतकर्यांना अजून प्रतिक्षाच असून यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
सरकारने केलेली 35 रुपये लिटर दर देण्याची घोषणा कागदावरच राहणार की काय ? असा सवाल उपस्थित राहत आहे.
पुरंदर तालुक्यातील काही गावांत अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पशुधन सांभाळणे जिकरीचे होत असून दावणीचे जनावर फक्त जागविण्यासाठी पशुपालक धडपडत आहेत.
आगोदरच शासनाकडून दुधास जाहीर केलेला दर फारच कमी असून दूध व्यवसाय परवडत नाही. शासनाने जुलैपासून जाहीर केलेले प्रतिलिटर पाच रुपये अनुदान अद्याप मिळाले नसून शासनाने दिलेले आश्वासन हवेतच विरेल का? – अविनाश दाते, दुध उत्पादक वाल्हे
शासनाकडून जाहीर केलेले 1 जुलै पासूनचे प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान वाटपास सुरुवात झाली असून कात्रज सहकारी दूध संघाच्या दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांतील प्रतिलिटर पाच रुपये दूध अनुदान रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
अनुदान रक्कम पात्र दूध उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होईल. – तानाजी जगताप, संचालक, कात्रज सहकारी दूध संघ





