नगर : कचरा डेपोमध्ये मृत डुकरांमुळे मोठी दुर्गंधी

दुर्गंधीमुळे डासांचा फैलाव; साथीचे आजार वाढले
पाथर्डी – नगरपरिषदेकडून कारेगाव शिवारातील कचरा डेपोवर उघड्यावर असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व साथरोगाचा फैलाव झाला आहे. कचरा डेपोमध्ये उघड्यावर टाकण्यात आलेल्या मयत डुकरांचे शरीराचे तुटके व पक्षांकडून लोचके तोडून शेतकऱ्यांच्या शेतात तसेच रहिवासी परिसरात टाकले जात आहे. मृत डुकरांमुळे या कचरा डेपोतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी या परिसरात पसरली असून डासांचा फैलाव झाल्याने सर्दी, ताप व खोकला अशा आजाराने परिसरातील नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत.
कारेगाव येथील उपसरपंच जालिंदर दहिफळे यांनी निवेदन देऊन नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांचे लक्ष वेधले. निवेदन देताच मुख्याधिकारी संतोष लांडगे हे नगरपरिषदेचे कर्मचारी घेऊन कचरा डेपोवर दाखल झाले. त्या ठिकाणी शेकडो मयत डुकरे उघड्यावर पडलेला त्यांना आढळून आला. त्यानंतर शनिवारी काही मृत्य अवस्थेतील डुकरांना खड्ड्यात पुरवण्यात आले. तर काही डुकरे अजूनही खड्ड्यात उघड्यावर आहेत.
हे मृत झालेले डुकर मोठ्या प्रमाणावर फुगले असून कोणताही क्षणी त्या शरीराची छिन्ह विच्छिन्न अवस्था होऊ शकते. मयत झालेल्या डुकरांवर कोणत्याही प्रकारचे औषध फवारणी अथवा त्यापासून लोकांच्या आरोग्याला बाधा पोहोचणार नाही, अशी कोणतीच उपाययोजना नगरपरिषदेकडून करण्यात आलेली नाही. अज्ञात आजाराने पाथर्डी शहरात दररोज वीस ते पंचवीस डुकरे मयत होत आहे. या डुकरांमुळेही शहरात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन अपयशी ठरला आहे.
डुकरांवरील आलेल्या आजाराने नागरिक आरोग्याच्या समस्येने हैराण झाले आहेत. अनेक लोकांना डेंग्यू सदृश्यसारखे आजारांनी ग्रासले आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारे ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. फक्त कागदपत्रे घोडे नाचवण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालण्याची मागणी दहिफळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कारेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाथर्डी शहरातील व वेगवेगळ्या ग्रामपंचायतचा कचरा टाकला जातो. या कचरा डेपोकडे पालिकेचे मुख्याधिकारी यांचे साफ दुर्लक्ष आहे. कोट्यवधी रुपये खर्चून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही.शेकडो मृत डुकरांचा खच या ठिकाणी पडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत आमदार मोनिका राजळे यांच्या आढावा बैठकीतूनही हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यावरती नगरपरिषदेचे मुख्यधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही.
जालिंदर दहिफळे, उपसरपंच कारेगाव.





