Pune News : महापालिका आयुक्तांकडून कचरा डेपोची पाहणी, प्रक्रिया क्षमता वाढवण्यावर देणार भर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी रविवारी देवाची उरुळी कचरा डेपोला भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी पुणे मनपाच्या बायोमायनिंग प्रकल्प, तसेच ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.या वेळी आयुक्तांनी हडपसर आणि घोले रोड येथील कचरा हस्तांतरण केंद्र यांचे आधुनिकीकरण करणे, घरोघरी जाऊन वाहनांद्वारे कचरा गोळा करण्यासाठी आधुनिक यंत्रणा
निर्माण करणे, स्मार्ट कलेक्शन केंद्र निर्माण करणे, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे कामकाज गतीने पूर्ण करण्याबाबत आदेश दिले. पुणे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि शाश्वत करण्यासाठी अजून नवे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता असल्याचे महापालिका आयुक्तांनी नमूद करून यापुढील काळात महापालिकेची कचरा प्रक्रिया क्षमता वाढविण्यावर विशेष भर देणार असल्याचे सांगितले.
लिगसी वेस्ट (जुना कचरा) यावर शास्त्रोक्त बायोमायनिंग/बायो-रिमेडियेशन प्रक्रिया एक वर्षाच्या आत पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करण्याचे आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. रिकामी करण्यात आलेली जागा लोकोपयोगी प्रकल्प अथवा विकास योजनांसाठी वापरणे शक्य होईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख संदीप कदम, कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप आणि अमर मदिकुंट, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते. पुणे महापालिका पर्यावरणीय दृष्टीने शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी कटिबद्ध असून, येणाऱ्या काळात नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ आणि हरित पुण्याच्या दिशेने पुढील पाऊले उचलली जातील, असे आयुक्त म्हणाले.



