Alandi News : कचरा डेपोला चार दिवसांत दुसऱ्यांदा आग ; आग लागते की लावली जाते? नागरिक संतप्त

प्रभात वृत्तसेवा
आळंदी – आळंदी येथील कचरा डेपोला शनिवारी (दि. १८) अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. कचऱ्याच्या ज्या ढीगाला आग लागली तो कचरा मध्यभागी असल्याने अग्निशामक दलाचे वाहन तिथपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत होत्या. जेसीबी मशीनच्या सहाय्याने मार्ग काढून अग्निशामक दलाची गाडी तिथपर्यंत पोचवून जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
स्थानिक नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कचरा डेपोच्या प्रवेशद्वार जवळपास आग लागली होती. तेव्हाही ती अग्निशमन दलाने आटोक्यात आणली होती. चार दिवस उलटले नाहीत. तोवर पुन्हा शनिवारी कचरा डेपोच्या मध्यभागी असणाऱ्या कचऱ्यास आग लागली आहे. कचरा डेपोच्या परिसरात सद्यस्थितीत थोडाफार कचरा वर्गीकरण करुन, त्यातून वस्तू-साहित्य एका बाजूला ठेवले आहे, खतनिर्मिती केली जाते त्या ठिकाणी प्लास्टिक बॅग-बूट आदी कचरा आढळून आला, असे प्रसाद बोराटे यांनी सांगितले.
रोहित्राशेजारील (डीपी) पत्रा शेड दुरावस्थेत आहे. कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वर्गीकरण झालेले नाही. मोकाट जनावरे येऊन कचरा खातात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यासही बाधा पोचू शकते.मात्र, डेपोच्या या विदारक परिस्थितीकडे प्रशासनाने दुलर्क्ष केले आहे. यंदाच्या मे महिन्यामध्ये सुद्धा कचऱ्यास भीषण आग लागली होती. कचरा डेपोत पूर्णपणे राखेचे ढीग साचले होते. नगरपरिषदेचे किती नुकसान झाले त्याची आकडेवारी सुद्धा पालिकेने जाहीर केली नाही. त्यामुळे सुरक्षिततेसाठी येथे सीसीटीव्ही तसेच कायमस्वरुपी रखवालदार अत्यावश्क आहे. या बाबींची पूर्तता करावी, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी लावून धरली आहे.





