Devendra Fadnavis : “माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल”; देवेंद्र फडणविसांच्या काकांनी व्यक्त केला विश्वास
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणविस यांच्या जीवनावर ‘देवाभाऊ’ या पुस्तकाचे प्रकाशन

Devendra Fadnavis : मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात जाण्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अनेक दावेही केले. मात्र भाजप नेत्यांनी हा दावा फेटाळूनही लावला. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल”, असं बाळासाहेब फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणविस यांच्या जीवनावर आधारित संतोष गाजरे लिखित ‘देवाभाऊ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी बाळासाहेब फडणवीस म्हणाले की, “भविष्यात देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, ही मनापासून इच्छा आहे. जनसंघाच्या काळात गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत राज्यभर घरचा डबा घेऊन पक्ष उभारणीसाठी केलेल्या संघर्षमय प्रवासाच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत.
गंगाधरराव यांची निष्ठा, जिद्द, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली बांधिलकी हेच गुण आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रकर्षाने दिसून येतात,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी केले.
पुढे ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा निवडून आले. इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कुणी यशस्वी झालं असेल. तसा माझा पुतण्या अतिशय धीरगंभीर आहे. तो घरात राजकारणाच्या गोष्टी करत नाही. कुटुंबासोबत ते अतिशय मोकळा असतो. त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्व आहे. त्यामुळे ते भविष्यात राजकारणात मोठी भूमिका बजावतील.
कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपुरातील नामवंत वकिलांकडे अल्पावधीसाठी काम केले. मात्र, जनसंघाच्या विचारसरणीशी जोडल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भविष्यात त्यांना मोठी जबाबदारी मिळेल. खरोखर आज ना उद्या माझा पुतण्या भारताता पंतप्रधान असेल, असं मला वाटतं”, असं वक्तव्य बाळासाहेब फडणवीस यांनी केलं.
या कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महाराष्ट्र बँकेचे संचालक प्रसेनजित फडणवीस, व्याख्याते विशाल गरड, प्रकाशक संतोष धायबर, संदीप कद्रे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटलांकडून मुख्यमंत्री फडणविसांचे कौतुक
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना दैवी शक्ती मिळाली आहे. सर्व बाबतीत ते सर्वगुणसंपन्न आहेत. २०१७ मधील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय त्यांनी एका रात्रीत घेतला. मराठा आरक्षणासाठी कायद्याचा सखोल अभ्यास करून तो न्यायालयात टिकेल अशी तयारीही त्यांनी केली. जलयुक्त शिवार, रखडलेले सिंचन प्रकल्प, शेततळी, पाणलोट विकास, मिसिंग लिंक, अटल सेतू आणि पूरनियंत्रण यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांमागे फडणवीस यांची दूरदृष्टी आहे.
अभ्यास, संवेदनशीलता, निर्णयक्षमता आणि सर्वसामान्यांशी कायम जोडलेले राहणे हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून त्यांचा स्वभाव त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देतो,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणविसांचे कौतुक केले.
हेही वाचा:






