‘खोट्या कागदपत्रांच्या आधारे माझ्या आईची बदनामी केली जातेय’ – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर मुंबईत डान्सबार चालविला जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधकांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अनिल परब आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी गृह राज्यमंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांनी विधान परिषदेच्या सभागृहात या संदर्भातील कागदपत्रे सादर करत आरोप केला की, मुंबईतील ‘सावली डान्सबार’चे परवाना मंत्री कदम यांच्या आईच्या नावावर आहे. “मी जी माहिती सादर केली आहे, ती माहितीच्या अधिकारातून मिळवलेली असून, यामध्ये जिओ-टॅगसह अक्षांश-रेखांश दिलेले आहेत. ही माहिती पोलिस एफआयआरमध्येही नमूद आहे,” असे परब यांनी सांगितले.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री योगेश कदम यांनी आरोप फेटाळले. “हे सर्व आरोप राजकीय द्वेषातून करण्यात आले आहेत. माझ्यावर हेतूपुरस्सर खोटे आरोप केले जात आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे माझ्या आईची बदनामी केली जात आहे. योग्य वेळ येताच मी सर्व पुरावे सादर करेन,” असे ते म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी करत म्हटले की, “सामान्य तलाठ्यावरील आरोपांवर तत्काळ कारवाई केली जाते, मग गृह राज्यमंत्र्यांवरही तशीच कारवाई व्हायला हवी. एकीकडे लाडक्या बहिणीला आशीर्वाद दिला जातो, तर दुसरीकडे महिला डान्सबारमध्ये नाचविल्या जातात, हे दुर्दैवी आहे.”
“जर या प्रकरणी तत्काळ कारवाई झाली नाही, तर यामागे सरकारचा पाठिंबा असल्याचे समजले जाईल,” असा गंभीर इशारा देत परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.





