Pune : सैफ अली खान यांच्यावरील हल्ला चोरीच्या हेतूने

पुणे : अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्यात गुन्हेगारी टोळीचा हात नाही, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. या हल्ला प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कदम यांनी ही माहिती दिली. मुंबईत यापूर्वी वांद्रे भागात अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानावर गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. या दोन्ही घटनांमागे कोणत्या टाेळीचा हात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.
यावर कदम म्हणाले, “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील छबीत एक संशयित आढळून आला आहे. या प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे.
खान यांच्या अपार्टमेंट परिसरात सुरक्षारक्षक नव्हते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलीस संशयितांच्या मागावर असल्याचे कदम म्हणाले.





