अनिल परब यांचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर खळबळजनक आरोप

मुंबई : राज्याच्या गृहराज्यमंत्रीपदी असलेल्या योगेश कदम यांच्या आईच्या नावे मुंबईतील कांदिवली येथे ‘सावली डान्सबार’ चालवला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी विधीमंडळात केला. या बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत २२ बारबाला आणि २२ ग्राहकांना ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना परब यांनी स्फोटक आरोप करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “डान्सबारवर बंदी असताना ‘सावली बार’ कसा काय सुरु आहे? या बारचे परवाना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर आहे. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असून गृहराज्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
“आई-बहिणींना नाचवता, आणि वर आशीर्वाद घेताय?”
परब पुढे म्हणाले, “एका बाजूला तुम्ही बहिणीच्या आशीर्वादाचे राजकारण करता आणि दुसरीकडे महिलांना डान्सबारमध्ये नाचवता? हे दोन चेहरे एकाच सरकारात चालणार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने कारवाई करावी. अन्यथा सरकार यामागे आहे, असा आरोप सिद्ध होईल.”
“महाराष्ट्र बिहार झाला का?”
या प्रकारामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत परब म्हणाले, “आज बिहारमध्ये लोक विचारत आहेत, तुमचा महाराष्ट्र बिहार झाला का? जर गृहराज्यमंत्रीच कायदे पायदळी तुडवत असतील, तर मुख्यमंत्री आणि सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.”
विधान परिषदेतही परबांचा रोष-
विधान परिषदेतही अनिल परब यांनी जनसुरक्षा विधेयक, वाहतूक यंत्रणा आणि आरटीओमधील गोंधळ यावरून सरकारला धारेवर धरले. “राज्यपालांच्या सुरक्षा कारणावरून आमच्या पीएला खाली उतरवले गेले, मग राज्यपालच सुरक्षित नाहीत तर ‘जनसुरक्षा विधेयक’ चाटायला ठेवले आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आरटीओतील बेकायदेशीर व्यवहाराचा मुद्दा-
“सचिन पाटील नावाच्या आरटीओ अधिकाऱ्याचा कंत्राटी ड्रायव्हर, ज्याचे कंत्राट संपलेले आहे, तोच अधिकारी बनून गाड्या अडवतो, यंत्र हातात घेऊन दंड आकारतो. अधिकाऱ्याच्या जागी ड्रायव्हर बसतो, आणि अधिकारी मागच्या सीटवर. याचे फोटो माझ्याकडे आहेत, मी ते पाठवणार आहे. यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी ठाम मागणीही परब यांनी यावेळी केली.





