माझी ड्युटी संपली ! वेळ संपल्यामुळे पायलट गेला घरी; ९ तास प्रवासी विमानतळावरच अडकले

नवी दिल्ली – पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय विमानात सोमवारी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. या विमानाच्या पायलटने ड्युटीची वेळ संपल्यामुळे जयपूरलच विमान सोडून तो निघून गेला.
पायलटच्या या पवित्र्यामुळे विमानातील 180 हून अधिक प्रवासी तब्बल 9 तास जयपूर विमानतळावरच ताटकळत राहीले आणि त्यांना याचा त्रास सहन करावा लागला. या प्रवाशांना नंतर रस्त्याने दिल्लीला पाठवण्यात आले.
हे एअर इंडियाचे एआय- २०२२ विमान होते. विमान रविवारी रात्री 10 वाजता पॅरिसहून दिल्लीसाठी निघाले होते. फ्लाइटची नियोजित वेळ सकाळी 10:35 होती, मात्र खराब हवामानामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही. यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचनेनुसार पायलटने जयपूरमध्ये विमान उतरवले.
पायलट दुपारपर्यंत फ्लाइटच्या क्लिअरन्सची वाट पाहत राहिला. जेव्हा क्लिअरन्स मिळण्यास उशीर झाला आणि पायलटच्या ड्युटीचे तास संपले तेव्हा त्याने फ्लाइट सोडले आणि सर्व प्रवाशांना कोणतेही स्पष्ट उपाय न करता वाट पाहण्यास सांगून निघून गेला.
झाल्या प्रकारानंतर संतप्त प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि पर्यायी विमानांची मागणी केली, परंतु विमान कंपन्यांकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. जयपूर विमानतळावर तब्बल 9 तास 180 हून अधिक प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.
मात्र, या काळात विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांचा असंतोष दूर करण्यासाठी त्यांना जेवण व इतर सुविधा दिल्या. यानंतर काही प्रवासी त्यांच्या वैयक्तिक वाहनातून दिल्लीला रवाना झाले. तर काहींना विमान कंपनीने बसमधून दिल्लीला पाठवले.





