Maharashtra Assembly Election 2024 : माझा बुथ सर्वांत मजबूत ! पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला मंत्र

Narendra Modi । Maharashtra Assembly Election 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रत्येक बुथ जिंकण्यावर फोकस करण्याचा मंत्र कार्यकर्त्यांना दिला. ‘माझा बुथ सर्वांत मजबूत’ या अभियानांतर्गत मोदींनी नमो ॲपद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बुथ स्तरावर महिला, तरूण आणि शेतकऱ्यांचे मेळावे घ्या. सरकारी योजनांचे व्हिडीओ मतदारांपर्यंत पोहचवा, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्रात विरोधी बाकांवर असणारी महाविकास आघाडी प्रचारावेळी खोटे पसरवत आहे.
ती वस्तुस्थिती कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचवावी. मी जातो तिथे मला कार्यकर्त्यांची कठोर मेहनत नजरेस येते. कार्यकर्ते माझे प्रतिनिधीच आहेेत. त्यांच्यामार्फत जमिनीस्तरावरील वास्तव माझ्यापर्यंत पोहचावे असाही माझा उद्देश असतो, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.
देशातील एससी, एसटी आणि ओबीसी अनभिज्ञ होते; तोपर्यंत कॉंग्रेस पक्ष केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करत होता. मात्र, एससी, एसटी आणि ओबीसींची एकजूट झाल्यावर कॉंग्रेसची स्थिती कमजोर होऊ लागली. त्यामुळे तो पक्ष त्या समुदायांमध्ये फाटाफूट करू इच्छितो, असे टीकास्त्र मोदींनी सोडले.
महाराष्ट्रातील महायुती सरकार समाजातील प्रत्येक घटकाच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील आहे. आपल्या आणि आधीच्या महाविकास आघाडी सरकारमधील तो फरक जनतेला जाणवत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे साकडे घालण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहचावे.
महायुती सरकारमुळे जनता प्रभावित झाली आहे. जनतेचे प्रेम मी प्रचार दौऱ्यांवेळी अनुभवले. जनतेला पुढील पाच वर्षांसाठी महायुतीचेच सरकार हवे आहे, असा दावा त्यांनी केला.





