Mutha River Flood: पावसाने पुण्याची दाणादाण! खडकवासलातून मोठा विसर्ग; एकतानगरीत पाणी, नागरिक स्थलांतरित
Mutha River Flood: खडकवासला धरणातून मुठा नदीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४३,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; शहरातील सखल भाग जलमय.

Mutha River Flood – खडकवासला धरणातून मुठा नदीत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४३ हजार५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्याने शहराच्या अनेक भागात शुक्रवारी पूरस्थिती उद्भवली. त्यामुळे नदीकाठच्या सुमारे दीड हजार नागरिकांंना स्थलांतरीत केले आहेत. सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी भागातही दहापेक्षा अधिक सोसायटयांमध्ये पाणी घुसले असून अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने पुन्हा एकदा नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दिवसभर पावसाने झोडपल्याने शहरात अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली. मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाला होते. २०२४ मध्ये या भागात पूरस्थितीमुळे नुकसान झाले होते. त्यानंतर, राज्यशासन तसेच महापालिकेने या भागातील पूरस्थिती रोखण्यासाठी केवळ घोषणाच केल्याने या भागातील नागरिकांना पुन्हा एकदा मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
महापौर मंजूषा नागपूरे यांच्यासह, सिंहगड रस्ता प्रभाग समितीचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी पूरग्रस्त भागाची पहाणी केली असून नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलविण्यासह या भागात सुरक्षेच्या उपाय योजना करण्याचे आदेश दिले. गुरूवारी रात्रीपासूनच शहरासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पाऊस सुरू होता.
त्यानंतर पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर चांगलाच वाढल्याने सकाळी ९ हजार क्यूसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात येत होते. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा विसर्ग दुपारी तीनपर्यंत टप्प्या टप्प्याने तब्बल ४३ हजार ७०० क्यूसेक पर्यंत वाढविण्यात आला. परिणामी, दुपारी तीनच्या सुमारास नदीकाठच्या भागातील शारदा सरोवर तसेच जलपूजन सोसायटीत पावसाचे पाणी घुसले.
पाणी वाढत असतानाच द्वारका सोसायटीच्या मागील बाजूस महापालिकेने तात्पुरता उभालेला मातीचा बांध पाण्याच्या प्रवाहाने फुटल्याने मोठया प्रमाणात पाणी आत घुसले परिणामी सायंकाळी पाच पर्यंत या भागात आठ ते दहा सोसायटयांमध्ये तसेच दहा ते बारा दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसले.
भिडेपूल बंद
नदीत मोठया प्र्माणात पाणी सोडल्याने दुपारी बारानंतर भिडेपूलासह नदीपात्रातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे नदीपात्रात पार्किंग केलेल्या १० ते १५ गाडया अडकून पडल्या होत्या. पाण्याचे प्रमाण वाढत असतानाही या गाड्या काढण्यासाठी कोणीच येत नसल्याने पोलिसांनी वाहनांच्या क्रमांकावरून वाहनाच्या मालकांशी संपर्क साधत त्यांना बोलावून घेतले.
मात्र, पाण्याचा प्रवाह आणि पाणी वाढल्याने या गाडया ढकलून तसेच क्रेनच्या साह्याने बाहेर काढल्या. मात्र, तरीही पाच ते सहा गाडया या पाण्यात अडकून पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. झेड ब्रीजच्या खाली असलेल्या अनेक हाॅटेल तसेच मेट्रो स्थानकाच्या खालील पत्र्याच्या शेडमध्ये पाणी घुसले. नदीपात्रात ढोल ताशा वादनासाठी उभारलेल्या अनेक मांडवाचेही पूराच्या पाण्याने नुकसान झाले.
नदीकाठी पथके
खडकवासला धरणातून मोठया प्रमाणात नदीत पाणी सोडल्याने वारजे, उत्तरनगर, शिवणे तसेच रजपूत झोपडपट्टी आणि पुलाचीवाडी परिसरात महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांची पथके तैनात केली आहेत. तर, ज्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे त्या भागातील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहेत. बहुतांश नागरिकांनी महापालिकेच्या मदत कक्षात न जाता नातेवाईकांकडे जात असल्याचे प्रशासनास सांगितले.






