बेल्हे :समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स म्युझियम लॅबचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील इतिहास, प्रगती आणि नवकल्पना यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने हे वैशिष्ट्यपूर्ण म्युझियम उभारण्यात आले आहे. या म्युझियममध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या मूळ संकल्पना, कॅपॅसिटर, रेसिस्टर, ट्रांजिस्टर यांपासून तयार केलेले सर्किट आणि त्यांची कार्यप्रणाली प्रदर्शित करण्यात आली आहे. याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून संशोधन आणि भविष्यातील करिअरच्या संधींवर चर्चा केली. हे म्युझियम तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आणि संशोधनाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आमदार अतुल बेनके यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्सची माहिती नसणाऱ्या व्यक्तीमध्येही हे प्रदर्शन पाहिल्यावर कुतूहल निर्माण होईल. विभागाचे प्रमुख प्रा. निर्मल कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आधुनिक सर्किट बोर्ड, मायक्रोप्रोसेसर आणि विविध उपकरणांचे मॉडेल्स अतिशय सुबकपणे मांडले आहेत. तांत्रिक संज्ञांचे स्पष्टीकरण फलक आणि डेमोच्या माध्यमातून सोप्या भाषेत करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.