महापालिकेच्या योजना महाडीबीटी पोर्टलवर

राज्य शासनाच्या पालिकेला सूचना
पुणे – महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजना तसेच शिष्यवृत्तीच्या योजनांचा लाभ आता नागरिकांना महाडीबीटी या राज्य शासनाच्या वेबपोर्टलच्या माध्यमातूनही घेता येणार आहे. पालिकेच्या सर्व योजना या पोर्टलशी सलग्न करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून नुकत्याच महापालिकेस देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेकडून शासनाच्या 2015 च्या आदेशाची अंमलबजावणी करत सर्व योजना 2017 पासून डीबीटीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. त्यात पालिका शाळांमधील मुलांना डीबीटीद्वारे गणवेश तसेच शालेय साहित्याचे अनुदान, महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणवेश, साहित्य तसेच पालिकेच्या समाजविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या 52 योजनांचाही समावेश आहे.
राज्य शासनाकडून 2015 ला काढलेल्या आदेशात शासकीय योजनांचे लाभ थेट रकमेच्या स्वरुपात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी 2017 मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर पुढील वर्षभरात टप्प्या टप्प्याने पालिकेच्या सर्व योजनांसाठी पालिकेकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून मदतीची तसेच अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा केली जात आहे. त्यासाठी पालिकेने स्वतंत्र वेबपोर्टलही तयार केले आहे. मात्र, त्यासोबतच आता राज्य शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवरही पालिकेच्या योजनांची माहिती तसेच ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून महापालिकेस नुकतेच पत्र पाठवण्याबाबत कळविण्यात आल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले.




