PUNE : झुकेंगे नही…!; महापालिका अतिक्रमण नियंत्रण विभागाचा दणका

येरवडा/विश्रांतवाडी- धानोरीत मंगळवारी अतिक्रमण नियंत्रण कारवाईवेळी जमावाने पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केली. यावर आक्रमक झालेल्या प्रशासनाने बुधवारी ही मोहीम तीव्र करत जागा बळकावणाऱ्यांना मोठ्या फौजफाट्यासह जबर दणका दिला. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून मंगळवारी झालेल्या मारहाणीचा निषेध केला. धानोरी ते पोरवाल रस्त्यावर ही कारवाई सायंकाळपर्यत सुरू होती. धानोरी-लक्ष्मीनगर येथून बुधवारी सकाळी कारवाई सुरू झाली. काही इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनवर कारवाई करण्यात आली. इमारतीला लागुन असलेले तसेच मोकळ्याजागीचे पत्रा शेडवर जेसीबीने पाडण्यात आले.फौजफाटा आणि प्रशासनाचा “मूड’ पाहून कारवाईला कोणीही विरोध केला नाही. ही कारवाई उपायुक्त माधव जगताप, परिमंडल- 1चे उपायुक्त संजय गावडे, सहायक आयुक्त वैभव कडलख, सुहास जगताप, विभागीय निरीक्षक डी. एस. ढोकळे या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. 10 जेसीबी, 25 ट्रक्स, 15 क्षेत्रीय कार्यालयांचे अतिक्रमण विभागाचे निरीक्षक, 250 बिगारी, महापालिकेचे 100 पोलीस कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभाग तसेच विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी असा फौजफाटा कारवाईवेळी तैनात होता.
इतके वर्षे कारवाईका केली नाही?
येथील मनपा भाजीमंडईत अनेक गाळे अनधिकृत होते. त्यावरही प्रशासनाने कारवाई केली. शिवाय, हातगाड्या जेसीबीने तोडण्यात आल्या. अनेक वर्षांपासून हे अतिक्रमण असूनही त्यावर कारवाई का केली जात नव्हती? असा सवालही नागरिक विचारत आहेत. प्रशासक असल्यामुळे पालिका आता बेधडक कारवाई करत आहे. मात्र, त्यात सातत्य असेल का? की, पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती होणार, असेही नागरिक विचारत आहेत.
पालिकेने वेळ द्यायला पाहिजे होता…
“लॉकडाऊननंतर आता व्यवसाय सुरळीत होत होते. अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय उभारले होते. मात्र, काही नेत्यांनी कमी भाडे आकारुन शेड मिळवून दिल्या होत्या. त्यांच्यावरच कारवाई केल्याने अनेकांची स्वप्न धुळीस मिळाली आहेत. पालिकेने दुकानातील साहित्यही काढण्यास वेळ न देता सरळ जेसीबी चालवल्याने मोठे नुकसान झाले आहे,’ अशा शब्दांत काही व्यापाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.
धानोरीत मंगळवारी अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर बुधवारची कारवाई हेतूपुरस्सर आणि सुडाच्या भावनेने करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आधीच अडचणीत आहेत. त्यांच्यावरील ही कारवाई चुकीची आहे. पालिकेचा व्यवसाय कर भरत असलेल्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवरही यावेळी चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली आहे. या कारवाईचा आम्ही निषेध करतो.
– अनिल (बॉबी) टिंगरे, माजी नगरसेवक





