इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ४० विषयांना मान्यता रेडा – घनकचरा व्यवस्थापन करण्याचा ठेका व मोकाट जनावरे पकडण्याचा ठेका रद्द करून नवीन निविदा मागविण्याबद्दल निर्णय इंदापूर नगरपरिषदेच्या मासिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजीराजे सभागृहात नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी शहरातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी 40 विषयांना मंजुरी देण्यात आली. नगरपरिषदेच्या हद्दीतील उद्यानाबाबत प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही. सुतार गल्ली, जामदार गल्लीमध्ये नागरिकांनी अंडरग्राउंड ड्रेनेज मागणी नगरपरिषदेकडे सातत्याने केली होती. दलित योजनेतून अकलूज रोड उमरे वस्ती ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठेनगर ते रामोशी गल्ली स्ट्रीट लाईट करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. अनपट वस्ती ते स्मशानभूमीपर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज तसेच दत्तनगर ते वडर गल्ली स्वच्छालयापर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज, ज्येष्ठ नागरिक भवन येथे पेव्हिंग ब्लॉक, सेफ्टी डोअर व लाईट फिटिंग, दत्तनगर रोडवर वीज व्यवस्था करण्यासाठी भूमिगत केबल टाकणे, अग्निशामक केंद्र येथे कायम वीजपुरवठा, शहर फाइव स्टार रेटिंग शहर म्हणून घोषित करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यावेळी शहराचा हागणदारीमुक्त दर्जा घोषित करणे, आरोग्य विभागातील राष्ट्रीय कार्यक्रमासाठी साहित्य व सजावटीचे साहित्य मागवण्यासाठी निविदा दरपत्रके मागविण्यासाठी मंजुरी देण्यात आली. यावेळी प्रशासनाचे काम गतिमान होण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शहा यांनी दिली. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी ठेका पुणे येथील एका खासगी कंपनीला काही महिन्यांपूर्वी दिलेला होता. यात सुधारणा करण्यात याव्यात, असे प्रशासनाने आदेश दिले होते. मात्र घनकचरा व्यवस्थापन फोल ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा ठेका रद्द करण्याचा ठराव व नवीन निविदा मागवण्याची मंजुरी सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आली. यावेळी नगरपरिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख, सर्व नगरसेवक उपस्थित होते. प्रभाग आठमधील कामे लागणार मार्गी शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये जवळपास आठ ते दहा महत्त्वाच्या कामांबाबत निर्णय यावेळी घेण्यात आला. यामध्ये कॉंक्रीटीकरण करणे, अंडरग्राउंड ड्रेनेज करणे, नवीन गटारी करणे, आदी दहा कामांचा समावेश आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक आठमधील प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत, यावर सभेत शिक्कामोर्तब केले. प्रथमच निधींचा समसमान वाटप “सिलसिला’ इंदापूर नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे दोनच गटाचे नगरसेवक असल्याने शासनाचा येणारा सर्व निधी सत्ताधारी व विरोधी यांच्या प्रभागांमध्ये विकासकामांसाठी देण्यात यावा, असा महत्त्वाचा विषय राष्ट्रवादीचे नगरसेवक श्रीधर बाब्रस, गजानन गवळी, पोपट शिंदे आदी नगरसेवकांनी लावून धरली. यामुळे या नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच समान निधी वाटपाचा सिलसिला झाल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधी नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला आहे.