पिंपरी | महापालिका उभारणार ज्येष्ठ नागरिक भवन : आयुक्त शेखर सिंह

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात ज्येष्ठ नागरिक भवन उभारणार असून विविध सोयी सुविधांनी युक्त असे भवन हे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणार्या जेष्ठ नागरिक भवनामध्ये त्यांच्यासाठी भव्य ऑडिटोरियम, सुसज्ज पार्किंग सुविधा, हॉल, ज्येष्ठ नागरिक संघासाठी स्वतंत्र कार्यालय, अशा अनेक सोयीसुविधा या भवनामध्ये नागरिकांसाठी उभारण्यात येणार आहेत.
तसेच विविध योजना, उपक्रम, कार्यक्रम आणि जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, बाबुराव फुले, ईश्वरलाल चौधरी,
शांताराम सातव, हेमचंद्र जावळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उप निरीक्षक दिनकर गावडे, व्याख्याते अशोक देशमुख,डॉ. श्रीकृष्ण जोशी,
आपटे काका, समाज विकास विभागाच्या रेश्मा पाटील, संतोषी चोरघे, प्रियंका रणसिंग, यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम, योजना, कार्यक्रम घेतले जातात.
त्याचा लाभ त्यांनी घ्यावा, तसेच आपले आरोग्य सांभाळून आनंदी व निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले.
प्रास्ताविक तानाजी नरळे यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक तसेच विकास गायकांबळे यांनी केले.
शहरात 134 ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत
शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 134 ज्येष्ठ नागरिक महासंघ कार्यरत असून ज्येष्ठ नागरिक संघांना दरवर्षी समाज विकास विभागामार्फत भेटवस्तू देण्यात येतात. सन 2022-23 यावर्षी 116 ज्येष्ठ नागरिक संघाना एलईडी टीव्ही देण्यात आले होते.
तर सन 2023-24 यावर्षी 102 ज्येष्ठ नागरिक संघांना साऊंड सिस्टिम व 26 ज्येष्ठ नागरिक संघांना प्रत्येकी 1 टेबल व 50 खुर्च्या देण्यात आलेल्या होत्या.
सन 2024-25 या वर्षामध्ये 134 ज्येष्ठ नागरीक संघांना प्रत्येकी 1 हार्मोनिअम (पेटी), 1 तबला जोड, 12 टाळ व 2 सतरंजा देण्यात येणार असून त्यापैकी 3 ज्येष्ठ नागरिक संघाना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले.





