महापालिका बांधकाम विभागाचा सावळागोंधळ!

नगर – सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे महापालिकाच विकासकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची तपासणी करण्यासाठीचे पत्र देते. त्यानुसार तंत्रनिकेतन महाविद्यालय तपासणी करून त्याचा तपासणी अहवाल (टेस्ट रिपोर्ट) महापालिकेला देते. मग बनावट तपासणी अहवाल महापालिकेकडे आले कसे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे तपासणीचे मागणी पत्र व तपासणीनंतर दिलेला अहवाल त्याबाबत आवक व जावक क्रमांक महापालिका व तंत्रनिकेतन दोन्हीकडे नोंद होते. त्याबरोबर तपासणी शुल्काची पावतीदेखील तंत्रनिकेतन महापालिकेला अहवालाबरोबर देते. असे असतानाही बनावट तपासणी अहवाल महापालिकेत आले. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाचा सावळागोंधळ चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील बनावट तपासणी अहवाल प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत भाजपच्या नगरसेवकांनी बनावट तपासणी अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु त्याला काही नगरसेवकांनी वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला. महापालिकेच्या बांधकाम विभागाची काही चूक नाही. तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून बनावट तपासणी अहवाल देण्यात आले आहे.
त्यामुळे ते दोषी असून, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे चांगल्या पद्धतीने काम सुरू असल्याची पावती दिली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येत असून, नगरसेवकांनी चौकशीसाठी वेळ द्यावा, असे सांगून या बनावट तपासणी अहवालावरून होणाऱ्या वादळी चर्चेला ब्रेक लावला. प्रत्यक्षात मात्र या बनावट तपासणी अहवाल प्रकरणामुळे मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. काका शेळके यांनी मनपा व सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे माहिती अधिकारात माहिती मागितली होती.
त्यानुसार मनपाकडे 725 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. परंतु सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून 350 तपासणी अहवाल दिले गेले आहेत. मनपा ठेकेदारांना पत्र देते, त्यानुसार ठेकेदार सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे शुल्क भरून वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा तपासणी अहवाल प्राप्त करत असते. असे महापालिकेच्या अभियंत्यांनी स्पष्ट केले. मात्र, याबाबत तंत्रनिकेतन महाविद्यालयात चौकशी केली असता महापालिकेकडून साहित्यांच्या दर्जाबाबत तपासणी करण्याची मागणीपत्र तंत्रनिकेतनला देते.
त्यानुसार काय काय साहित्य तपासणी करावयाची त्यानुसार तपासणी शुल्क भरू घेण्यात येते. त्यानंतर तपासणी करून तपासणी अहवाल व त्याबरोबर शुल्क भरलेली पावती हे सर्व एकत्रित महापालिकेला दिले जाते. ठेकेदारांच्या हातात अहवाल दिला जात नाही. तसेच आवक व जावक क्रमांक देखील या तपासणी अहवालात नोंदविला जातो. त्याबरोबर शुल्क भरलेल्या पावतीचा क्रमांकदेखील या अहवालात स्पष्टपणे नमूद केला जातो. असे असताना बनावट तपासणी अहवाल महापालिकेत आला कसा याचे उत्तर आता महापालिकेच्या बांधकाम विभागाला द्यावे लागणार आहे.
चौकशी अधिकारी रजेवर!
बनावट तपासणी अहवाल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केली आहे. मात्र, ते चौकशी करण्यापूर्वीच रजेवर गेले आहेत. त्यामुळे ते रजेवरून परत आल्यानंतर चौकशी होणार आहे.





