Mundhwa Land Scam : तब्बल १ हजार ८८६ पानांचे दोषारोपपत्र; शीतल तेजवानीच्या अडचणीत मोठी वाढ
Mundhwa Land Scam : मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीविरोधात पुरावे गोळा; आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले हजारो पानांचे दोषारोपपत्र.

Mundhwa Land Scam – मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीच्या विरोधात तब्बल १ हजार ८८६ पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात तेजवानीसह इतरांवर गुन्हा दाखल आहे. मात्र, इतरांविरोधात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.घोटाळा प्रकरणातील तेजवानी मुख्य सूत्रधार असल्याचेही समोर आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनी, संचालक दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले,
हेमंत गवंडे यांच्यावर बोपोडी व मुंढवा अशा दोन जमीन प्रकरणांत पुण्यातील खडक पोलिसांत एकच गुन्हा नोंद झाला. सद्य परिस्थितीत गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या अनुषंगाने दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती.
हेमंत गवंडे चौकशीला हजर राहिले. नंतर शीतल तेजवानी हिच्याकडे दोन दिवस सलग चौकशी झाली. तिच्याकडील कागदपत्रेही जप्त करण्यात आली. त्याच वेळी महार वतनाचे वारसदार असलेल्या व्यक्तींचेही जबाब नोंदविण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.
चौकशीत शीतल तेजवानीने शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार यांच्याकडून जमिनीची २००५-६ मध्ये पॉवर ऑफ ऍटर्नी करून घेतली. त्याच्यासाठी त्यांना काही रक्कम दिली. मात्र, वास्तविक जागा मुंबई शासनाची होती. जागा बॉटेनिकल गार्डनच्या ताब्यात होती, तरीही तिने वतनदारांकडून जमिनीची पॉवर ऑफ ऍटर्नी करून घेतली.
नंतर महसूलमंत्री व कोर्टात जागेसंदंर्भात दावे दाखल करून जमीन रिग्रॅण्डसाठी प्रयत्न केले. महसूल मंत्रालयाने याविरोधात निकाल दिला. दावे फेटाळले. नंतर न्यायालयानेही तीन वेळा या जागेसंदंर्भातील दावा फेटाळला. त्यानंतरही तिने तहसील कार्यालयात जागेसंदंर्भात डिसेंबर २०२४ मध्ये ११ हजार रुपयांचा डीडी भरून कागदपत्रे तयार केली. या जमिनीचा ७/१२ बंद आहे.
त्यानंतर ही जागा अमेडिया कंपनीला स्वत:च्या फायद्यासाठी परस्पर विक्री केल्याचे पोलिसांनी सांगितले. हा सर्वप्रकार तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला पुन्हा चौकशीला बोलावले. त्याच दिवशी तिला अटक करण्यात आली होती. या जमीन गैरव्यवहारात शीतल तेजवानीचा सहभाग असल्याने तिच्या विरोधात पोलिसांनी पुरावे गोळा करून हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.






