Dhananjay Munde : सरकारी बंगला न सोडणाऱ्या मुंडेंचा गिरगाव चौपाटीवर आलिशान फ्लॅट; खरेदी केल्यापासून बंदच

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मंत्रिपद गमावल्यानंतरही तब्बल पाच महिन्यांपासून ते मुंबईतील सरकारी निवासस्थान ‘सातपुडा’ बंगला रिकामा करत नसल्याने वाद निर्माण झाला आहे. यामुळे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना बंगला मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आणि मुंबईत दुसरे घर नसल्याचे सांगत बंगला सोडला नसल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्याच विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी गिरगाव चौपाटीवर 16.5 कोटी रुपये किमतीचा आलिशान 4 बीएचके फ्लॅट असल्याची माहिती दिली आहे. यामुळे त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गिरगाव चौपाटीवर कोट्यवधींचा आलिशान फ्लॅट
धनंजय मुंडे यांनी डिसेंबर 2023 मध्ये गिरगाव चौपाटीवरील एन.एस. पाटकर मार्गावरील ‘वीरभवन’ या 22 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावर 2150 चौरस फुटांचा 4 बीएचके फ्लॅट खरेदी केला. या फ्लॅटची किंमत 16 कोटी 50 लाख रुपये असून, यातील 10 कोटी रुपये धनंजय मुंडे यांनी स्वतः खर्च केले आहेत, तर उर्वरित रक्कम त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावे आहे.
विशेष म्हणजे, खरेदी केल्यापासून हा फ्लॅट बंदच असून, सध्या त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. या फ्लॅटमध्ये कोणीही राहत नसल्याची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडेंना ठोठावला 42 लाख रुपये दंड
मंत्रिपद गमावल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी ‘सातपुडा’ बंगला रिकामा न केल्याने त्यांच्यावर 42 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माफ करण्याचा अधिकार आहे, परंतु मुंडे यांनी अद्याप ही रक्कम भरलेली नाही. त्यांनी मुंबईत दुसरे घर नसल्याने आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईत राहणे आवश्यक असल्याचे कारण देत बंगला सोडला नसल्याचा दावा केला होता. मात्र, गिरगाव चौपाटीवरील कोट्यवधींच्या फ्लॅटच्या मालकीमुळे त्यांचा हा दावा खोटा ठरत असल्याची टीका होत आहे.




