राज्यातील ‘या’ पुलाचे नाव आता ‘सिंदूर’.! १० जुलैला ऐतिहासिक लोकार्पण

मुंबई : दक्षिण मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर करून आता त्याला ‘सिंदूर’ हे नाव देण्यात आले आहे. भारताच्या पाकिस्तानविरोधी ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित हा पूल १० जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित होणार आहे. या पुलामुळे पूर्व-पश्चिम मुंबईतील वाहतूक सुलभ होणार असून, गेल्या १० वर्षांपासूनची वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.
सिंदूर पूल (पूर्वीचा कर्नाक) दक्षिण मुंबईतील पी. डि’मेलो मार्गाला क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव यांसारख्या व्यावसायिक भागांशी जोडतो. हा पूल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. १५० वर्षे जुना कर्नाक पूल धोकादायक ठरल्याने मध्य रेल्वेने ऑगस्ट २०२२ मध्ये तो पाडला होता. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मध्य रेल्वेच्या मंजूर आराखड्यानुसार नव्या पुलाची पुनर्बांधणी केली.
पुलाची वैशिष्ट्ये काय?
एकूण ३२८ मीटर (रेल्वे हद्दीत ७० मीटर, बीएमसी हद्दीत २३० मीटर – पूर्वेस १३० मीटर, पश्चिमेस १०० मीटर).
आरसीसी आधारस्तंभांवर ७० मीटर लांब, २६.५ मीटर रुंद आणि १०.८ मीटर उंचीच्या दोन तुळया (५५० मेट्रिक टन वजन).
आरसीसी डेक स्लॅब, डांबरीकरण आणि पोहोच रस्त्यांचे काम १० जून २०२५ रोजी पूर्ण.
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पूल विभागाने काम पूर्ण केले.
वाहतुकीसाठी फायदे
पूर्व-पश्चिम वाहतूक सुलभ होऊन पी. डि’मेलो मार्ग, वालचंद हिराचंद मार्ग आणि शहीद भगतसिंग मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल.
युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग आणि काझी सय्यद मार्गावरील वाहतूक सुधारेल.
वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी नवीन पर्याय उपलब्ध होईल.
ऑपरेशन सिंदूरला समर्पित
पाकिस्तानविरोधी कारवाईचे प्रतीक म्हणून या पुलाला ‘सिंदूर’ नाव देण्यात आले आहे. हे नामकरण देशाच्या शौर्याला आणि सामरिक विजयाला सलाम करणारे आहे. लोकार्पण सोहळ्याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले असून, हा पूल मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवे पर्व सुरू करेल.





