MCA President Election: पराभूत झाल्यावर संदीप पाटील यांनी व्यक्त केल्या भावना,म्हणाले “माझ्या विजयापेक्षा…”

मुंबई – मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा पराभव झाला त्यामुळे काहीसा निराश झालो आहे. मात्र, माझ्या विजयापेक्षाही मुंबईच्या क्रिकेटची प्रगती जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे मी नवनियुक्त अध्यक्ष अमोल काळे यांचे अभिनंदन करतो तसेच येत्या काळात मुंबई क्रिकेटच्या वाटचालीत माझी काहीही मदत आवश्यक असेल तर ती करण्यात मला आनंदच होईल, अशा शब्दात या निवडणुकीत पराभूत झालेले भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या निवडणुकीत बाळ महाडदळकर गटावर शरद पवार-अशिष शेलार पॅनलने वर्चस्व राखले. त्यात पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांनी 23 मतांनी बाजी मारली व अध्यक्षपद पटकावले. त्यांना एकूण 343 पैकी 181 मते मिळाली. काळे हे गेल्या तीन वर्षांपासून एमसीएमध्ये विविध पदांवर कार्यरत होते. ते संघटनेचे उपाध्यक्षही होते.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व भाजपचे नेते आशिष शेलार यांच्यात युती झाली होती. त्यामुळे यंदाची निवडणूक राजकीय ठरली. या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव करत अध्यक्षपद मिळवले.
राजकीय एकी क्रिकेटच्या प्रगतीसाठीही कायम राहावी
या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना अमोल काळे यांचे कौतुक करत अभिनंदनही केले. तसेच त्यांनी या निवडणुकीसाठी एकाच पॅनलमध्ये एकत्र आलेले राजकीय व्यक्ती मुंबईच्या क्रिकेटच्या प्रगतीसाठीही कायम एक राहतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. माझा विजय व पराभव याला महत्त्व देत नाही तर येत्या काळात अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने मुंबईच्या क्रिकेटला नवी उंची मिळवून द्यावी, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.





