प्रामाणिक मेहनतीचा विजय: आबाजी भालेरावने मिळवले ‘महानिर्मिती’मध्ये ‘असिस्टंट इंजिनिअर’चे पद

पुणे – परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील वडगाव या छोट्याशा गावातून आलेल्या आबाजी भालेराव या तरुणाने आपल्या जिद्दीच्या आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवत महानिर्मितीमध्ये असिस्टंट इंजिनिअर वर्ग-2 या पदावर निवड होऊन आपल्या कुटुंबाचा आणि गावाचा मान वाढवला आहे. आबाजीने दैनिक प्रभातशी संवाद साधताना आपल्या संघर्षमय प्रवासाची आणि यशाची प्रेरणादायी कहाणी सविस्तर सांगितली. त्याच्या या यशाने अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही.
आबाजीचे वडील शेतकरी आहेत. शेती हाच त्यांच्या कुटुंबाचा मुख्य आधार आहे. अशा परिस्थितीत आबाजीच्या शिक्षणाला पाठबळ देणे त्यांच्या कुटुंबासाठी सोपे नव्हते. तरीही त्यांनी आबाजीच्या स्वप्नांना पंख दिले. आबाजीने आपले प्राथमिक शिक्षण वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण वसमत येथे घेतले. त्यानंतर त्याने पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याने हैदराबाद येथे काही काळ स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले, पण कोरोनाच्या लॉकडाऊन काळात तो पुण्यात परतला आणि तिथेच अभ्यासाला सुरुवात केली.
गेल्या पाच वर्षांपासून आबाजी पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. या काळात त्याने अनेकदा राज्यसेवा परीक्षा दिल्या, पण 1-2 गुणांनी यश त्याला हुलकावणी देत होते. तरीही त्याने हार मानली नाही. अखेर 2024 मध्ये त्याने महानिर्मितीच्या असिस्टंट इंजिनिअर वर्ग-2 पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेत 150 पैकी 128 गुण मिळवत त्याने ओपन कॅटेगरीतून निवड मिळवली. या परीक्षेचा निकाल एप्रिल 2025 मध्ये जाहीर झाला आणि आबाजीच्या मेहनतीला यश आले. हे यश मिळवण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, पण त्याने कधीही आपला मार्ग सोडला नाही.
आबाजीच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्याचा धाकटा भाऊ एमबीबीएससाठी निवडला गेला होता. त्यामुळे दोघांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी वडिलांना शेतीतून मिळणारा पैसा पुरत नव्हता. अशा परिस्थितीत कुटुंबाने कर्ज काढून आबाजीला दरमहा 5-6 हजार रुपये पुरवले. आबाजी सांगतो, “माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले. त्यांनी कधीही मला पैशांची कमतरता भासू दिली नाही. त्यांच्या या पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो.” आता आबाजीला नोकरी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या यशाने कुटुंबाच्या आशा पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत.
आबाजीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना सांगितले, “आपण ज्या क्षेत्रात आहोत, ते कधीही सोडू नये. कितीही अडचणी आल्या तरी प्रामाणिकपणे अभ्यास करत राहावे. यश नक्कीच मिळते.” त्याने आपला दिनक्रमही सांगितला. तो दररोज 8 तास अभ्यास, 8 तास झोप आणि 8 तास दैनंदिन कामांसाठी ठेवायचा. या पाच वर्षांच्या काळात त्याने कधीही थिएटरमध्ये चित्रपट पाहिला नाही किंवा इतरत्र फिरण्यात वेळ घालवला नाही. “अभ्यासिका ते रूम हाच माझा दिनक्रम होता. मी माझे पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले होते,” असे तो सांगतो. या प्रामाणिक मेहनतीचे फळ त्याला आज मिळाले आहे.
आबाजीचे हे यश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्याने दाखवून दिले की, आर्थिक अडचणी, अपयश आणि इतर आव्हानांवर मात करूनही प्रामाणिक मेहनत आणि सातत्याने यश मिळवता येते. त्याच्या या यशाने अनेक तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल, यात शंका नाही. आबाजीच्या या यशाने त्याच्या कुटुंबासह संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे.





