Mumbai Traffic Police : मुंबईत होळीदिनी ३.१७ कोटींचा दंड वसूल; मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई
Mumbai Traffic Police :

Mumbai Traffic Police : होळीच्या उत्सवादरम्यान वाहतूक पोलिसांनी मंगळवारी शहरात विशेष मोहीम राबवत, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल १६,७२७ चलन जारी करून, ३.१७ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. तसेच, मोहिमेदरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईतील प्रमुख चौकांमध्ये, वर्दळीच्या रस्त्यांवर आणि महामार्गांवर दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अनेक चेक-पॉइंट उभारण्यात आले होते. मद्यपान करून वाहन चालवणे, ओव्हरस्पीडिंग, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ट्रिपल सीटसह दुचाकी चालवणे, सिग्नल जंप करणे, नो एंट्रीचे उल्लंघन करणे आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवणे यासाठी ही कारवाई करण्यात आली.
मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल पकडलेल्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याच्या ४,३१७ प्रकरणांमध्ये ४२,९७,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.





