Maharashtra Politics : शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला; चाकूने सपासप केले वार
Maharashtra Politics : मुंबईतील पवई परिसरात राष्ट्रवादी (शरद पवार गट) युवा जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे.

Maharashtra Politics : शहरातील पवई परिसरात शरद पवार गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवा जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर यांच्यावर आयआयटी बाजार रोडवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. भर रस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले.
या हल्ल्यात कुशेर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्याचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
यापूर्वी केरळमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावरही हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे देशातील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र आहे.





