Traffic Police Action: नंबरप्लेट लपवून डंपरची बेदरकार धाव! वाहतूक पोलिसांचा दणका; ५ डंपरवर कारवाई
Traffic Police Action: चिंचवडगाव परिसरात नंबरप्लेट नसलेल्या व अस्पष्ट नंबरप्लेट असलेल्या ५ डंपरवर वाहतूक पोलिसांची मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई.

Traffic Police Action – नंबरप्लेट लपवा आणि बिनधास्त डंपर पळवा, अशा पद्धतीने शहरातील रस्त्यांवर वावरणाऱ्या अवजड वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. चिंचवडगाव परिसरात नंबरप्लेट नसलेल्या अथवा अस्पष्ट नंबरप्लेट असलेल्या पाच डंपरवर वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली. विशेष म्हणजे, एका जागरूक नागरिकाने सोशल मीडियावर केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या विविध गृहप्रकल्प, रस्ते आणि विकासकामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर यांसह अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, यातील काही वाहनचालक वाहतूक नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र आहे. काही डंपरच्या मागील बाजूस नंबरप्लेटच नसते. तर काही वाहनांच्या नंबरप्लेटवर चिखल किंवा माती फासलेली असते.
त्यामुळे वाहनाचा क्रमांक स्पष्ट दिसत नाही. अपघात किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहनाची ओळख पटू नये, यासाठीच हा प्रकार केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुरुवारी दुपारी चिंचवडगावातील पोदार शाळेसमोरील गल्ली तसेच तालेरा रुग्णालय परिसरात सात डंपर उभे असल्याचे एका नागरिकाच्या निदर्शनास आले.
त्यापैकी पाच डंपरच्या मागील नंबरप्लेट गायब किंवा अस्पष्ट असल्याचे आढळले. नागरिकाने या वाहनांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांना माहिती दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी केली. तपासणीत पाच डंपर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायदा कलम १२२ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
“नंबरप्लेट लपवून किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून शहरात धावणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक विभागाची करडी नजर आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
– विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त.




