Mumbai Rain : समुद्र खवळला, उंचच्या उंच लाटा..; मुंबईवर दुहेरी संकट !

मुंबई – मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून पुढच्या तीन ते चार तासांसाठी मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेत तर 5 ते 6 फूट इतके पाणी साचले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
मुंबईवर एकीकडे मुसळधार पावसाचे संकट असताना दुसरीकडे समुद्राला उधाण आलेलं बघायला मिळत आहे. लाटांचा वेग, उंची वाढली आहे. समुद्राच्या उंचच्या उंच लाटा किनाऱ्यावर धडकताना दिसत आहे. समुद्राला मोठी भरती आलेली आहे.
समुद्राच्या लाटा या तब्बल 4.21 मीटरवर उसळल्या आहेत. तसेच ही परिस्थिती पुढचे काही तास अशीच राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मरीन ड्राइव्ह आणि समुद्र किनारी भागात फिरायला जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
मान्सूनने महाराष्ट्र व्यापला
छत्रपती संभाजीनगर, परभणी, पुणे , पिंपरी चिंचवड, कल्याण, ठाणे, लातूर, नांदेड आणि कोकणात सध्या पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. पुढील काही तासांसाठी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला होता. हवामान खात्यानुसार, विदर्भाच्या काही भागांमध्येच आता मान्सून पोहोचणे शिल्लक आहे. बाकी बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे.





