Mumbai Pune Expressway : अखेर मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत; तब्बल 32 तासांच्या टँकर हटवण्यात यश
Mumbai - Pune Expressway : मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरुळीत सुरू

Mumbai Pune Expressway : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मंगळवारी (3फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला.
या अपघातामुळं मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अखेर मुंबई-पुणे महामार्गावरची वाहतूक तब्बल 32 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुरुळीत सुरू झाली आहे.
खबरदारीमुळे मोठी दुर्घटना टळली
तीन मोठ्या क्रेनच्या मदतीने टँकर अत्यंत सावधगिरीने हटवण्यात आला आहे. टँकरमध्ये काही प्रमाणात गॅस शिल्लक असल्याची शक्यता असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्यांकडून सतत पाण्याचा मारा करण्यात येत होता.
प्रशासनाकडून घेतलेल्या खबरदारीमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे पाहायला मिळाले. मात्र या एका अपघातामुळे प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला समोर जावं लागलं आहे. मात्र आता वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरु झाली आहे.
प्रवाशांचे अतोनात हाल
अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात मोठा धोका निर्माण झाला. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि तांत्रिक तज्ज्ञांची पथके दाखल झाली.
रात्री उशिरापर्यंत गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र प्राथमिक टप्प्यात गळती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अपयश आले. त्यामुळे महामार्ग तब्बल २४ तासांहून अधिक काळ ठप्प राहिला.
या घटनेमुळे महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना तासन्तास वाहनांमध्ये थांबावे लागले. अनेक प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. काही प्रवाशांच्या विमानप्रवासाच्या वेळा चुकल्या, तर काहीजणांना नियोजित कामे पुढे ढकलावी लागली.
रुग्णवाहिकांमध्ये असलेले रुग्णही वाहतूक कोंडीत अडकले होते. दीर्घकाळ वाहतूक थांबल्यामुळे काही रुग्णांच्या उपचारांवर परिणाम झाला. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी आणि अन्य सोयींचा मोठा अभाव जाणवला.
शेतकऱ्यांना आर्थिक फटका
मुंबई बाजारपेठेत भाजीपाला आणि शेतीमाल घेऊन जाणाऱ्या शेकडो वाहनांचा ताफा या वाहतूक कोंडीत अडकला. अनेक वाहनांमध्ये नाशवंत माल असल्यामुळे २४ तासांहून अधिक काळ माल पडून राहिला. परिणामी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा :
Pune Census 2027 : पुणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेपासून जनगणनेचा पहिला टप्पा; प्रशासनाची मोठी तयारी






