Pune Water Supply : पाणी कमी होणार की कायम राहणार? महापालिकेच्या ‘या’ उत्तरावर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून
Pune Water Supply : खडकवासला धरणातील यंत्रणा हस्तांतरणाचा पेच कायम; पाटबंधारे विभागाच्या तक्रारीनंतर प्राधिकरणाची पुण्याच्या पाण्यावर करडी नजर.

Pune Water Supply – शहरातील पाणी वापर कमी करण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पुणे महापालिका प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय खडकवासला धरणातून पाणी उचलण्यासाठी उभारण्यात येणारी यंत्रणाही पाटबंधारे विभागाकडे का हस्तांतरीत करण्यात आली नाही, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही प्राधिकरणाने दिले होते.
त्यानंतर अखेर महापालिकेने आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.प्रतिज्ञापत्रात पाणी वापर कमी केलेला नसला, तरी त्यासाठी कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याबाबत कळविले आहे. त्यामुळे शहराची सद्यस्थितीची पाण्याची गरज लक्षात घेता महापालिकेस पाणी वापर कमी करणे शक्य नसल्याने या प्रतिज्ञापत्रानंतर प्राधिकरण पुण्याचे पाणी कमी करणार,
की पाण्याचे नियंत्रण पाटबंधारे विभागास देणार, यावर शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन अवलंबून असणार आहे.महापालिका ठरवून दिलेल्या मापदंडानुसार पाणी वापरत नसल्याची तक्रार महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीवर सध्या सुनावणी सुरू आहे.
पुणे महापालिकेचा पाणी वापर जास्त असल्याची तक्रार पाटबंधारे विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे, तसेच सांडपाण्यावर पुरेशी प्रक्रिया केली जात नसल्याची बाबही वारंवार उपस्थित केली जाते. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने महापालिकेला शहरातील पाणी वापर कमी करण्याचे आदेश दिले असून, त्या अनुषंगाने कोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, महापालिकेने अद्याप पाणी वापरात प्रत्यक्ष कपात केलेली नाही. पाणी वापर कमी केल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, त्यातून नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा रोष सहन करावा लागणार आहे. त्यातच महापालिकेच्या निवडणूका असल्याने कोंडी झालेल्या महापालिकेने पाणी कमी करण्यासाठी कोणताही निर्णय घेतलेला नव्हता.
काय आहे महापालिकेची भूमिका
महापालिकेकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शहराची हद्द वाढली असून, लोकसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे साहजिकच पाण्याची गरज वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जायका प्रकल्प आणि अमृत योजनेअंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर सांडपाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया केली जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
शहराच्या भौगोलिक रचनेमुळे सध्या असमान पाणीपुरवठा होत असून, वाढीव पाणी वापर असूनही सर्व भागांना समान पाणी मिळत नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, समान पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल, असा दावा महापालिकेने केला आहे. ही योजना लवकरच पूर्ण केली जाईल, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.






