Society Registration : गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीचा जाच संपला; ‘या’ पोर्टलवर एका क्लिकवर मिळणार प्रमाणपत्र
Society Registration : कागदपत्रे अपलोड करण्यापासून ते शुल्क भरण्यापर्यंत सर्व सुविधा आता डिजिटल; नोंदणी प्रमाणपत्रही मिळणार ऑनलाईन.

Society Registration – गृहनिर्माण सोसायटी असो, की स्वयंरोजगार सोसायटीची नोंदणी करावयाची आहे, त्यासाठी आता सहकार खात्याच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. कारण ही नोंदणी आता ऑनलाइन करता येणार आहे. त्यामुळे घरबसल्या अर्जापासून ते नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे यापुढील काळात नव्याने निर्माण होणाऱ्या सोसायट्यांची नोंदणी करणे आणखी सोपे होणार आहे.
सहकारी संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवणारा सहकार विभाग हा प्रमुख शासकीय विभाग आहे. राज्यातील सहकारी बँका, पतसंस्थांबरोबरच विविध कार्यकारी सोसायट्या आणि गृहनिर्माण सोसायट्यांच्या कारभार या खात्यामार्फत चालविला जातो. त्यामुळे सोसायटी स्थापन करावयाची असेल, त्यांची नोंदणी सहकार खात्याकडे करणे बंधनकारक आहे.
ऑनलाइन नोंदणीची सुविधा आपले सरकार या पोर्टलवर ही उपलब्ध करून देण्याचा निर्णय सहकार खात्याने घेतला आहे. महाआयटीच्या माध्यमातून सध्या प्रायोगिक तत्त्वावर त्यांची चाचणी सुरू असून, लवकरच ही सुविधा राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.
आपले सरकार या पोर्टलवर ‘राइट टू सर्व्हिसेस’ मध्ये जाऊन सहकार खात्याच्या पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेथे सोसायटी नोंदणी करण्यासाठीचा अर्ज, आवश्यक कागदपत्रांची सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. त्याआधारे आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करणे आणि शुल्क ऑनलाइन भरता येणार आहे. त्यानंतर नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र ही ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी
राज्यात गृहनिर्माण संस्थांबरोबरच स्वयंरोजगार, बेरोजगार, आदिवासी, मजूर संस्था अशा विविध प्रकाराच्या सुमारे ५६ प्रकाराच्या सोसायट्या आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी सध्याच्या प्रक्रियेनुसार सहकार खात्याकडे अर्ज करावा लागत होता.
अर्जासोबत कोणी कागदपत्रे जोडावी लागतात येथपासून ते अनेक गोष्टींची माहिती नसल्यामुळे सोसायटीची नोंदणी करण्यास आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होतो. नागरिकांच्या सोयीसाठी सहकार खात्याने ही सुविधा ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतला.





