Mumbai Indians Coaches : मुंबई इंडियन्सच्या नव्या कोचिंग स्टाफची घोषणा! जुन्या मॅचविनर्सची घरवापसी; पाहा कोणाकडे कोणती जबाबदारी?
Mumbai Indians Coaches : मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२७ साठी आपल्या नवीन प्रशिक्षक संघाची घोषणा केली आहे.

Mumbai Indians Announce New Coaching Staff for IPL 2027 Robin Uthappa T Dilip Join : आयपीएल २०२७ च्या आगामी हंगामासाठी पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) संघाने आपल्या संपूर्ण नव्या कोचिंग स्टाफची घोषणा केली आहे. २०२६ च्या हंगामानंतर जुन्या सपोर्ट स्टाफची गच्छंती करत फ्रँचायझीने आधीच वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू किरॉन पोलार्डकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली होती. आता पोलार्डच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या नव्या चमूमध्ये भारताचा माजी आक्रमक फलंदाज रॉबिन उथप्पा आणि टीम इंडियाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्यासह अनेक अनुभवी चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
उथप्पा, मॅक्लेनघन, टी. दिलीप अन् धवल कुलकर्णीकडे मोठी जबाबदारी –
मुंबई इंडियन्सने जाहीर केलेल्या नव्या कोचिंग पॅनेलमध्ये रॉबिन उथप्पा याची फलंदाजी प्रशिक्षक (Bating Coach) पदी निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन याच्याकडे मुख्य गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय संघासोबत दीर्घकाळ काम करणारे टी. दिलीप नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (Fielding Coach) असतील, तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याला डेव्हलपमेंट बॉलिंग कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारे खेळाडू –
Mumbai Indians today announced the appointment of Robin Uthappa as Batting Coach, Mitchell McClenaghan as Bowling Coach, T. Dilip as Fielding Coach and Dhawal Kulkarni as Development Bowling Coach for the upcoming IPL 2027 season.
They will join Head Coach Kieron Pollard as part of a new-look coaching group that brings together a strong understanding of the Mumbai Indians culture, extensive international experience and a shared commitment to developing talent and delivering success.
https://t.co/cA7yI5Khpk
— Mumbai Indians (@mipaltan) October 30, 2026
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सपोर्ट स्टाफला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. रॉबिन उथप्पा २००७ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. मिचेल मॅक्लेनघनने न्यूझीलंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लक्षवेधी मारा केला आहे. धवल कुलकर्णीनेही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची छाप पाडली आहे, तर टी. दिलीप हे आधुनिक व्यावसायिक कोचिंगमधील अत्यंत विश्वासार्ह नाव मानले जाते.
‘घरवापसी’: तिन्ही माजी खेळाडू पुन्हा एकाच छताखाली –
Robbie talks about a new role at a familiar place, the clarity he wants to give to youngsters, and making MI a force outside of Wankhede too! 👊
Watch to hear from our new Men’s Batting Coach! 😁 https://t.co/mrFysRgF1r
— Mumbai Indians (@mipaltan) October 30, 2026
या नियुक्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रॉबिन उथप्पा, मिचेल मॅक्लेनघन आणि धवल कुलकर्णी हे तिघेही यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी मैदानात खेळाडू म्हणून खेळले आहेत. त्यामुळे या सर्वांची ही एका प्रकारे मुंबई इंडियन्सच्या गोटात ‘घरवापसी’ ठरली आहे. मुख्य प्रशिक्षक पोलार्ड स्वतः दशकभर मुंबईचा सर्वात मोठा मॅचविनर राहिला असल्याने या संपूर्ण फळीला फ्रँचायझीच्या संस्कृतीची आणि विजयाच्या फॉर्म्युल्याची परिपूर्ण जाणीव आहे.
२०२० नंतरचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे आव्हान –
मुंबई इंडियन्सने २०२० मध्ये शेवटचा आयपीएल चषक उंचावला होता; तेव्हापासून संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. सलग काही हंगाम निराशाजनक कामगिरी पाहिल्यानंतर फ्रँचायझीने संपूर्ण व्यवस्थापनात हा मोठा बदल केला आहे. खेळाडूंच्या कौशल्याला आकार देऊन संघात पुन्हा एकदा चॅम्पियन्सची मानसिकता निर्माण करणे आणि २०२७ मध्ये ट्रॉफीचा दुष्काळ संपवणे हेच या नव्या कोचिंग युनिट पुढील सर्वात मोठे उद्दिष्ट असणार आहे.





