Vande Bharat – मुंबई – गांधीनगर वंदे भारत पुन्हा एकदा वादात अडकली आहे. साधारण महिनाभरापूर्वी भारतीय रेल्वेवर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला होता. मुंबई-गांधीनगर वंदे भारतला पालघर येथे थांबा देण्याऐवजी वलसाड येथे थांबा दिल्याने महाराष्ट्रातून आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्याला महिना उलटतो तोच पुन्हा एकदा वंदे भारत वादात सापडली आहे. आता या ट्रेनला गुजरातमध्ये आणखी एक थांबा मिळाला आहे. यंदा वलसाडपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवसारीला नवा थांबा मिळाला आहे. 23-24 ऑगस्टपासून मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस नवसारी येथेही थांबेल. नवसारी स्थानक सुरतपासून 29 किमी आणि वलसाडपासून 39 किमी अंतरावर आहे. गेल्या तीन वर्षात गुजरातमधील हा चौथा थांबा आहे. मात्र पालघर जिल्हा दुर्लक्षित राहिला आहे. गुजरातमधील थांबा आणि महाराष्ट्रातील अंतर 140 किलोमीटरपर्यंत आहे. नवीन थांबा हा सद्याच्या स्थानकाच्या फार जवळ आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, वलसाड ते वापीमधील अंतर 24 किमी, नवसारी ते सुरतमधील अंतर 29 किमी आणि आनंद ते बडोद्यामध्ये 35 किमी अंतर आहे. प्रत्यक्षात गुजरातमध्ये 68 किमी अंतरात सुरत-नवसारी-वलसाड स्थानकं येतात. दुसरीकडे पालघर जिल्ह्याला पूर्णपणे बायपास करण्यात आलं आहे. ज्यामुळे बोरीवली ते वापी यादरम्यान तब्बल 140 किमी नॉन स्टॉप मार्ग आहे. विशेषत: यामध्ये पालघर, डहाणू आणि बोईसर यांसारखे प्रमुख प्रवासी आणि औद्योगिक केंद्र आहेत, ज्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा प्रवाशांचा आरोप आहे.