मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे निलंबित; SIT चौकशीचे आदेश, प्रकरण जाणून घ्या

मुंबई: मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्यांचे तात्काळ निलंबन केले आहे. भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत सांगवे यांच्यावर मागील तारखा टाकून लाखो रुपये उचलणे, शेकडो फाइल्स चुकीच्या पद्धतीने मंजूर करणे आणि शासकीय तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान केल्याचा आरोप केला. यासह, सांगवे यांनी “कोणी माझे काही करू शकत नाही” असे आव्हान दिल्याचा दावाही उपाध्याय यांनी केला.
उपाध्याय यांनी सांगवे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, गेल्या 13 वर्षांपासून ते एकाच खात्यात कार्यरत आहेत आणि त्यांनी अनेकांना “सर्व कामे करून देतो” अशी ऑफर दिली. आमदार रणधीर सावरकर यांनी तर सांगवे हे विधानसभा परिसरात 2 ते 5 कोटी रुपये घेऊन फिरत असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर सभागृहात गोंधळ उडाला.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी IAS, IPS आणि शिक्षण तज्ञांची विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली. “कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असे भुसे यांनी स्पष्ट केले. सांगवे यांना तूर्त निलंबित करण्यात आले असून, एका आठवड्यात चौकशी पूर्ण करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. या प्रकरणाने शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे.




