पत्रकार वारिशे हत्या प्रकरणाची होणार SIT चौकशी; न्याय मिळण्याची अपेक्षा

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक स्थापन केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. वारीशे (वय48) यांची 6 फेब्रुवारी रोजी हत्या झाली होती.
जमीन व्यवहाराचे दलाल पंढरीनाथ आंबेरकर यांनी त्यांच्या गाडीला जाणिवपुर्वक धडक देऊन त्यांना जबर जखमी केले. रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आंबेरकर या परिसरात प्रस्तावित रिफायनरीच्या भूसंपादनास विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला धमकावत असे.
आंबेरकर यांच्या कारवायांच्या संबंधात वारिशे याने स्थानिक मराठी वृत्तपत्रांत लेख लिहुन त्याच्या भानगडींवर प्रकाश टाकला होता. त्यामुळे त्यांचा बदला घेण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली असे सांगितले जात आहे. राजापुर पेट्रोल पंपा जवळ वारिशे यांच्या गाडीला धडक देण्याचा प्रकार घडला होता.
या प्रकरणी काल पत्रकारांनी मंत्रालयात निदर्शने केली होती. तसेच विरोधी पक्षांनीही या प्रकरणी सरकारला जाब विचारला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील पोलीस प्रशासनाला एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.एसआयटीचे नेतृत्व उच्चपदस्थ अधिकारी करतील.





