मुंबई : २६ नोहेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्यात वीर मरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २२) श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले. कल्पना पवार काय म्हणाल्या? यावेळी बोलताना कल्पना पवार म्हणाल्या की, ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी सतत सर्वसामान्य जनतेला न्याय दिला आहे. राज्यातीला सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे व राज्यातील महिलांचे लाडके भाऊ असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद पोलीस यांच्या पत्नीस थेट पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश दिल्याने त्यांची शहीदांप्रति असलेली संवेदनशीलता दिसून आली आहे, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. श्रीमती पवार म्हणाल्या, ‘माझ्या पती प्रमाणेच मलाही देशसेवा करण्याची संधी दिली आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी आणि देशाच्या रक्षणार्थ प्राणाचे बलीदान दिलेल्या शहीद वीरांचे आहे. हे माझ्या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.’ असं देखील त्या यावेळी म्हणाल्या आहेत. काय झालं होतं त्या रात्री? २६ नोहेंबर २००८ रोजी पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. सुरूवातीला झालेल्या गोळीबारानंतर हा गँगवॉरचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला, नंतर मात्र हा दहशतवादी हल्ला सल्याचं लक्षात आलं. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांचे काही धाडसी अधिकारी शहीद झाले. लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईची शान म्हणून ओळख असेलल्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात १६० हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाब याला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं. २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील कामा रुग्णालयाजवळ एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्या हत्येनंतर कसाब आणि त्याच्या दहशतवादी गटाने एक स्कोडा कार हायजॅक केली. ती कार मलबार हिलच्या दिशेने जात होती. या कारला थांबवण्यासाठी डीबी मार्ग पोलिसांच्या एका टीमने गिरगाव चौपाटीवर नाकाबंदी केली. या नाकाबंदीवर कार थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. कार थांबवण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढे सरसावल्यानंतर कसाबने आपल्या एके ४७ रायफलने पोलिसांवर फायरिंग केली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे आणि इतर पोलिसांनी कसाबला पकडण्याचा प्रयत्न केला. तुकाराम ओंबळे न डगमगता निर्भयपणे कसाबवर तुटून पडले यावेळी झालेल्या गोळीबाराच तुकाराम ओंबाळे शहीद झाले आणि पोलीस निरीक्षक संजय गोविळकर जखमी झाले. पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या इस्माईल या दहशतवाद्याला ठार केलं आणि कसाबला जिवंत पकडलं.