पिंपरी | मुळशीला हवाय पूर्णवेळ गटविकास अधिकारी

हिंजवडी, (वार्ताहर) – मुळशी पंचायत समितीचे प्रशासक म्हणून कार्यरत असलेले तालुक्याचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्याकडे मुळशीचा पूर्णवेळ तर मावळचा अतिरिक्त पदभार आहे.
त्यामुळे प्रशासकीय राजवटीत हे दोन्ही तालुके सांभाळणे मोठे आव्हानात्मक बनले असून दोन्ही तालुक्यांचा कामाचा व्याप पाहता दोन्ही तालुके सांभाळताना गटविकास अधिकाऱ्यांची एखाद्या ग्रामसेवकाप्रमाणे ससेहोलपट होऊ लागली आहे. तीन दिवस मावळचा तर तीन दिवस मुळशीचा कारभार ते पाहत आहेत. यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबत आहेत.
मुळशी आणि मावळ हे दोन्ही तालुके भौगोलिक दृष्ट्या मोठे असून मुळशीला सहाय्यक गटविकास अधिकारी देखील उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने मावळ तालुक्याला स्वतंत्र गटविकास अधिकारी नेमून भागवत यांना फक्त मुळशी तालुक्याचा गटविकास अधिकारी म्हणून पदभार सोपवावा अशी मागणी मुळशी तालुक्यात जोर धरू लागली आहे.
सुमारे एक वर्षापूर्वी गटविकास अधिकारी संदीप जठार यांची रायगड जिल्ह्यात बदली झाली. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी काही दिवस त्यांच्या जागी अतिरिक्त पदभार संभाळला.परंतु त्यांची पदोन्नती झाल्याने ते कोल्हापूरला रुजू झाले .
त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी महिन्यात मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची बदलीने मुळशी पंचायत समितीला नेमणूक करण्यात आली. मात्र त्यांच्या जागी मावळला कुणीच अधिकारी नियुक्त केला नसल्याने भागवत यांच्याकडे मावळचाही अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे ते तीन दिवस मावळ तर तीन दिवस मुळशीचा कारभार सध्या पाहतात. अडीच वर्षे होऊन गेली तरी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूका राजकीय उदासीनता व आरक्षणाच्या मुद्द्यांमुळे झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रशासकच पंचायत समितीचा कारभार सांभाळत आहेत.
तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनाचा लाभ घेताना अडचणी येतात. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामे पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने प्रलंबित राहात आहेत. पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारी नसल्याने पंचायत समितीचे विविध विभागाचे कर्मचारी देखील केवळ हजेरी लावण्याचे काम करताना दिसतात. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होताना दिसत असून अनेकांना पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारण्याची नामुष्की येते.
मनमानी पद्धतीने कारभार – ढमाले
मुळशीत गटविकास अधिकारी पूर्ण वेळ नसल्याने ग्रामसेवक तसेच पंचायत समितीतील अन्य कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नसून ते मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. तरी मुळशीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळावा अशी मागणी शिवसेना (उबाठा गट) महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख स्वाती ढमाले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मुळशी मावळला अधिकारी केव्हा भेटणार ?
मुळशी व मावळ तालुक्यात पंचायत समितीची सहाय्यक गटविकास अधिकारी पद रिक्तच असून या दोन्ही तालुक्यात सहाय्यक गटविकास अधिकारी पद केव्हा भरणार तसेच मावळसाठी हक्काचा गटविकास अधिकारी केव्हा नियुक्त करणार? अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांमधून होऊ लागली आहे.





