Mulshi Panchayat Samiti : मुळशीत ‘घड्याळा’चा गजर, पण ‘तुतारी’ची दमदार एंट्री! पाहा, कोणाचं वर्चस्व अन् कोणाचा पत्ता कट?
Mulshi Panchayat Samiti : राष्ट्रवादीची मुळशीवर पकड कायम, ६ पैकी ३ जागा जिंकत मिळवले काठावर बहुमत; तुतारीने २ जागांसह दिले तगडे आव्हान.

Mulshi Panchayat Samiti – मुळशी पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सहापैकी तीन जागांवर विजय मिळवत काठावर बहुमत मिळविले. तुतारी चिन्हावर दोन जागा जिंकत प्रतिस्पर्ध्यांनी ताकद दाखविली, तर भाजपाने एक जागा मिळवत पंचायत समितीत प्रवेश केला; मात्र शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही.2017 च्या तुलनेत समीकरणे बदलली आहेत. त्या वेळी राष्ट्रवादीला चार आणि शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या. जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीने दोन, तर सेनेने एक जागा राखली होती.
दरम्यान, माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा गट भाजपात गेल्याने कमळाची ताकद वाढली. तालुक्यात राष्ट्रवादी, ठाकरेसेना आणि भाजप यांचे वेगवेगळ्या भागांत वर्चस्व होते. उमेदवारीच्या टप्प्यात सर्वच पक्षांत नाराजीनाट्य रंगले. घड्याळ, मशाल आणि कमळ या तिन्ही चिन्हांभोवती इच्छुकांची मोठी गर्दी होती. आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच निवडणूक असल्याने त्यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली.
राष्ट्रवादी (शरद पवार गट), ठाकरेसेना, भाजप आणि शिंदेसेनेने सर्वच गणांत जोरदार मोर्चेबांधणी केली.एकूणच, या निवडणुकीत राष्ट्रवादीने सत्ता राखली असली तरी तुतारीने मजबूत आव्हान उभे केले आहे. भाजपानेही आपली उपस्थिती दर्शविली; मात्र दोन्ही सेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. तालुक्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी या निकालातून दिसून आली आहे.
पौड गणात घड्याळाची बाजी
पौड गणात राष्ट्रवादीने दोन्ही उमेदवारी धरण भागात दिल्याने ठाकरेसेनेच्या स्वाती ढमाले व भाजपाच्या पल्लवी कंधारे यांना आशा होती. मात्र अंतर्गत नाराजी व समन्वयाच्या अभावामुळे घड्याळाच्या काजल मोरे यांनी विजय मिळविला.
अंबडवेटमध्ये उलटफेर
सेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या अंबडवेटमध्ये राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार प्रविण धनवे यांनी ठाकरेसेनेचे तालुका प्रमुख सचिन खैरे यांच्यावर मात केली. कोळवण खोर्यातही घड्याळाचा गजर झाला.
माण गणात बंडखोरीचा फटका
माण गणात भाजपाला बंडखोरीचा फटका बसला. राष्ट्रवादीच्या मंदा शेळके विजयी झाल्या. भाजपाच्या दोन्ही उमेदवारांच्या मतांची एकत्रित बेरीज जास्त असली तरी विभागलेल्या मतांमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र हिंजवडी गणात जिल्हा परिषदेचे शिवाजी बुचडे यांच्या पाठबळामुळे भाजपाच्या ऐश्वर्या वाघमारे विजयी झाल्या.
तुतारीचा उदय
पिरंगुट गणात तुतारीचे राहुल पवळे विजयी होत मतदारांनी त्यांच्या कामाची पोचपावती दिली. एकाच गावात चार पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने मतविभाजन झाले. भूगाव गणात तुतारीचे नवखे दगडूकाका करंजावणे यांनी बाजी मारली. अनिल पवार यांनी मशाल चिन्हावरून कडवी लढत दिली; मात्र अखेरीस तुतारीचा विजय झाला.





