प्रभात वृत्तसेवा पिरंगुट – मुळशी तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेती सिंचनासाठी टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून २ टीएमसी वाढीव पाणी मंजूर करावे, अशी ठाम मागणी भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमत गुणोले यांची सिंचन भवन, पुणे येथे भेट घेऊन शिष्टमंडळासह निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात मुळशी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रविंद्र कंधारे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश मोरे, युवा नेते मिलिंद वाळंज, प्रकाश वाघ, बबनराव धिंडे, माऊली साठे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. निवेदनात आमदार मांडेकर यांनी नमूद केले आहे की, मुळशी तालुक्यात टाटा कंपनीचे मुळशी धरण असून, कंपनीच्या सहकार्याने तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील पाण्याचा वापर केला जातो. सध्या मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा १ व टप्पा २ अंतर्गत प्रत्येकी २२ गावे अशा एकूण ४४ गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन काम सुरू झाले आहे. या योजनेसाठी १.२ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, याबाबत वारंवार मागणी करूनही अद्याप मंजुरी मिळालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोळवण खोऱ्यातील गावांसाठी व सुमारे ३ हजार एकर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी आरक्षित ठेवणे आवश्यक असून, भविष्यात मुळशी तालुक्यातील अन्य पाणीपुरवठा योजनांसाठीही पाण्याची गरज वाढणार आहे. त्यामुळे टाटा धरणातून २ टीएमसी वाढीव पाण्याची तरतूद करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागण्यांचाही समावेश याचबरोबर कोळवण–वाळेण पुलासाठी निधी उपलब्ध करणे, कोळवण तालुका मुळशी उपसा सिंचन योजना, वांगणी–वाजेघर उपसा सिंचन योजना (ता. राजगड-वेल्हे), शिवगंगा उपसा जलसिंचन योजना (ता. भोर), धोम–बलकवडी उपसा जलसिंचन योजना तसेच महुडे बु., महुडे खु., करंजगाव–भानुसदरा परिसरातील गावांसाठी उपसा जलसिंचन योजनांना मंजुरी देण्याची मागणीही करण्यात आली. तसेच मुळशी धरण परिसरातील ५२ गावांना गावठाण व गावठाण विस्तार मंजूर करावा, धरणग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले देण्यात यावेत आणि टाटा कंपनीच्या सीएसआर फंडातून मुळशी धरण परिसरातील गावांसाठी विकासकामांना निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आमदार शंकर मांडेकर यांनी केली आहे.