Bhor Panchayat Samiti : भोरमध्ये नशिबाचा कौल राष्ट्रवादीला! ‘चिठ्ठी’ने ठरवला सभापती..पाहा कोणी मारली बाजी?
Bhor Panchayat Samiti : भोर पंचायत समितीच्या ८ जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी ४ उमेदवार विजयी झाल्याने सत्तेचा पेच; अखेर चिठ्ठीद्वारे झाली निवड.

Bhor Panchayat Samiti – पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ४ उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे सत्तेचे पारडे कोणाकडे झुकणार, याची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला लागली होती. सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. सोमवारी झालेल्या निवडीत सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून मनीषा कंक आणि भाजपकडून सुषमा चव्हाण यांनी अर्ज भरले होते. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे विशाल कोंडे आणि भाजपचे ज्ञानेश्वर पांगारे रिंगणात होते.
भोर तालुक्यात यापूर्वी ६ गण होते, मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत २ गणांची वाढ होऊन ती संख्या ८ झाली आहे. यापैकी ४ पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल कोंडे (नसरापूर), तृप्ती खुटवड (कामथडी), राजेश बोडके (भोलावडे), मनिषा कंक (शिंद) निवडूण आले आहेत. तर, भारतीय जनता पक्षाकडून ज्ञानेश्वर पांगारे (वेळू), रोहन बाठे (भोंगवली), गीता आंबवले (कारी), सुषमा चव्हाण (उत्रौली) गणातून विजयी झाल्या.
भोरमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व
भोर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर आमदार आहेत. तर, भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अलीकडेच राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे निवडून आले आहेत. आता पंचायत समितीच्या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर राष्ट्रवादीचे उमेदवार नशीबवान ठरल्याने तालुक्यात राष्ट्रवादीचे पूर्णतः वर्चस्व निर्माण झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
भोर पंचायत समिती सत्तासंघर्षात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे संख्याबळ समसमान असल्याने अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या निवडीत चिठ्ठीद्वारे राष्ट्रवादीच्या मनीषा कंक यांची सभापतीपदी, तर विशाल कोंडे यांची उपसभापतीपदी निवड झाली. दोन्ही महत्त्वाच्या पदांवर राष्ट्रवादीचेच उमेदवार नशीबवान ठरल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.





