Mulshi News – मुठा (ता. मुळशी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे. दवाखान्याबाहेर चक्क “आज बंद आहे” असा आशयाचा फलक लावण्यात आला होता. आमदार शंकर मांडेकर यांनी अचानक भेट देत येथे वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर दवाखान्यात अस्वच्छता असल्याचे आढळून आल्याने याबाबत त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मुठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या भागातील सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा देखील होत आहे. काल आमदार शंकर मांडेकर हे कातवडीवरून मुठ्याकडे येत होते. दरम्यान त्यांना दवाखान्याजवळ काही नागरिक बाहेर जाताना दिसले. त्यांनी या नागरिकांचे थांबून संवाद साधला. त्यावेळी हा दवाखाना बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. आमदार शंकर मांडेकर यांनी तात्काळ याची दखल घेत अचानकपणे दवाखान्यात भेट दिली. यावेळी “आज बंद आहे” असा आशयाचा फलक बाहेर लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित नसल्याचे देखील त्यांनी पाहिले. याबाबत आमदार मांडेकर यांनी तात्काळ आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांना दूरध्वनीकरून कामात तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असा इशारा देखील आमदार शंकर माडेकर यांनी दिला आहे.