Mulshi News: रिक्त अंगणवाडी मदतनीस पदे तत्काळ भरावीत; बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन
Mulshi News: १२ वी उत्तीर्णच्या अटीमुळे आदिवासी भागातील स्थानिक महिला रोजगारापासून वंचित; शैक्षणिक पात्रता शिथिल करण्याची मागणी.

Mulshi News : मुळशी तालुक्यातील मुगाव येथील कातकरीवस्तीसह विविध गावांमधील रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी, या मागणीसाठी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. जनआंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक युवराज गटकळ,सत्यशोधक बहुजन आघाडीचे नागेश गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्त्या राधा कांबळे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिरम यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
बालकांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर परिणाम
निवेदनात नमूद केल्यानुसार, मुगाव (कातकरीवस्ती) आणि मुळशी तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदाची जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे. कातकरीवस्तीसारख्या आदिवासी व दुर्गम भागातील बालकांच्या योग्य संगोपनासाठी, पोषण आहार वितरणासाठी आणि पूर्व-प्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडी सुरळीत चालणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, मदतनीस पदे रिक्त असल्यामुळे अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजावर तसेच लहान मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर विपरीत परिणाम होत असून स्थानिकांना रोजगार मिळण्यातही अडचण निर्माण होत आहे.
शैक्षणिक पात्रतेच्या अडीअडचणींवर चर्चा
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिरम यांच्यासोबत एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि मदतनीस पदभरतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले असले, तरी २०२३ च्या शासन आदेशानुसार शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुर्गम व आदिवासी भागातील वस्तुस्थिती पाहता, या निकषांमुळे अनेक पात्र स्थानिक महिलांना प्रक्रियेतून बाहेर राहावे लागत असून, ही मुख्य अडचण मदतनीस पदभरतीमध्ये येत असल्याचा मुद्दा शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसमोर मांडला.





