Mulshi News : मुळशीतील वीटभट्टी मालकांच्या डोळ्यात पाणी; एका पावसाने होत्याचं नव्हतं केलं
Mulshi News : अवकाळी पावसाचा तडाखा आणि मजुरांच्या तुटवड्यामुळे मुळशी तालुक्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात; वाढत्या खर्चामुळे व्यावसायिक मेटाकुटीला.

Mulshi News : एप्रिल महिन्यात तयार झालेल्या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे मातीच्या विटा बनवणारे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मागील काही दिवसांत काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. वीट तयार करण्यासाठी लागणारा सर्वच कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती तसेच मजुरांचा वाढता खर्च लक्षात घेता तसेच सध्याचे पावसाचे वातावरण कायम असल्याने व्यावसायिकांवर चिंतेची टांगती तलवार आहे.
वीट व्यवसायासाठी लागणारी लाल माती मुळशी तालुक्यात नैसर्गिक रीतीने मुबलक उपलब्ध असल्याने तालुक्यात अनेक गावात विट व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. शहरी भागात वाढत्या बांधकाम व्यवसायात सिमेंट विटांचा वापर होत असला तरी शहरी भागातील बंगले व ग्रामीण भागातील घरांसाठी अजूनही मातीच्या विटांना चांगली मागणी आहे.
परंतु मागील कालावधीत सुरू असलेले इराण अमेरिका युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला गॅसचा तुटवडा त्यामुळे गावी परतत असलेले कामगार व सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस यामुळे वीट व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस अवकाळी पाऊस राहणार असल्याचे सांगितले जात असल्याने यावर्षी वीट व्यावसायिकांना ऐन हंगामात नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
वीटभट्टी मालक पोपटराव दुडे म्हणाले, वीट व्यवसायाला सध्या मानवी व नैसर्गिक अशा दोनही संकटाचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात रॉयल्टी भरून कशीबशी माती जमविल्यानंतर त्यासाठी लागणारे मजूर परप्रांतातून कसेतरी जमवावे लागतात.
काहीवेळा हे मजूर अंगावर पैशांची उचल घेऊन तात्पूरत्या सुट्टीच्या नावाखाली पसार होतात. हे सारे कष्टाने जमवून आणले विटा तयार झाल्या. त्यातच अवकाळी पाऊस आला तर त्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे वीटभट्टी चालकावर नेहमी चिंतेची टांगती तलवार असते.





