Pune Rain Updates – शहरासह उपनगरांतील वाढते कमाल तापमान आणि उकाड्याने असह्य झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटांसह झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा मिळाला. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसाने चाकरमान्यांची धांदल उडाली. मंगळवारी (दि. २१) शहराच्या पश्चिम भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, मागील दोन दिवसांत पावसाने हुलकावणी दिल्याने कमाल तापमानात दोन ते अडीच अंशाने वाढ झाली. परिणामी ३९ अंशांपर्यंत खाली आलेले कमाल तापमान पुन्हा ४१ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. लोहगाव येथे ४१.१, शिवाजीनगर ३९.९, बारामती ३९.२, हडपसर ३८.६, तर एनडीए येथे ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत उकाड्याने पुणेकर हैराण झाले. आज सकाळपासूनच वातावरणात बदल दिसून येत होता. कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण असा ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळाला. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे दुपारी घामाच्या धारा वाहत होत्या, ज्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. दुपारी चारच्या सुमारास उपनगरांमधील वातावरणात अचानक बदल झाला. कात्रज, हडपसर, वाघोली, धायरी आणि सिंहगड रस्ता परिसरात आकाशात काळे ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अवकाळी पाऊस, पुणे अचानक आलेल्या या पावसाने कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांची धावपळ उडवून दिली. उपनगरांत पाऊस सुरू असताना शहराचा मध्यवर्ती भाग मात्र सायंकाळपर्यंत ढगाळ होता. मात्र, रात्री सातच्या सुमारास आकाशात अचानक ढगांचा मोठा गडगडाट सुरू झाला आणि विजांच्या लख्ख कडकडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. डेक्कन, कोथरूड, पेठ परिसर, स्वारगेट आणि शिवाजीनगर भागांत पावसाचा जोर अधिक होता. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता, की रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. उपनगरांतील वीजपुरवठा खंडित पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने सायंकाळच्या पीक अवरमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली. खबरदारीचा उपाय म्हणून आणि काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे उपनगरांतील वीजपुरवठाही काही काळासाठी खंडित करण्यात आला होता, ज्यामुळे नागरिकांचे हाल झाले. दरम्यान, पुणे शहरसह जिल्ह्यात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र, तर दुपारनंतर ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.