Mulshi Burglary: मुळशी तालुका हादरला! एकाच रात्री ११ घरे फोडली; महावितरणलाही लावला चुना…नेमकं काय घडलं?
Mulshi Burglary: घरफोडीसोबतच मुठा, भरेकरवस्ती व जातेडे परिसरातील ३ विद्युत रोहित्र (DP) फोडून ९० किलो तांब्याची तार केली चोरी; पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.

Mulshi Burglary – मुळशी तालुक्यातील जातेडे येथे २६ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११ घरे फोडून धुमाकूळ घातला. या घरफोडीत रोख रकमेसह चांदीचे दागिने असा १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला, तर अन्य दोन घरे फोडण्याचा प्रयत्न फसला आहे. एवढेच नव्हे, तर याच परिसरात चोरट्यांनी तीन विद्युत रोहित्र फोडून २७ हजार रुपयांची तांब्याची तारही लांबवली आहे.
याप्रकरणी धनाजी तुकाराम कुडले (वय ५४, रा. जातेडे, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी शेजाऱ्यांनी फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती धनाजी कुडले यांना दिली. त्यांनी तत्काळ घरी येऊन पाहिले असता, कपाटात ठेवलेली ९ हजार रुपयांची चांदीची जोडवी आणि ९ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी धनाजी कुडले यांच्यासह तानाजी कुडले, सागर कुडले, श्रीहरी कुडले, नामदेव कुडले, संतोष कुडले, सुनील कुडले, भालचंद्र कुडले, सिंधू कोंढेकर, नारायण कुडले आणि माऊली शेडगे यांची घरे फोडली. तर नितीन कोंढेकर व फबा कोंढेकर यांच्या घरातील चोरीचा प्रयत्न फसला. घरफोडीच्या घटनेसोबतच अज्ञात चोरट्यांनी मुठा,
भरेकरवस्ती आणि जातेडे परिसरातील महावितरणचे तीन विद्युत रोहित्र (डीपी) खाली पाडले. त्यातील ९ कॉइल मधील ९० किलो वजनाची तांब्याची तार चोरून पोबारा केला. याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी संतोष केसवड यांनी पौड पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दिली आहे. एकाच रात्री झालेल्या या मोठ्या चोऱ्यांमुळे जातेडे व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पौड पोलीस अधिक तपास करत आहेत.





