Mulshi Pattern 2: ‘मुळशी पॅटर्न २’ च्या नावाला मुळशीकरांचा विरोध! कथानकाला नाही, पण ‘या’ कारणासाठी आक्षेप
Mulshi Pattern 2: 'मुळशी पॅटर्न २' चित्रपटाच्या घोषणेनंतर मुळशी तालुक्यात तीव्र असंतोष; नाव वगळण्यासाठी सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांची बैठक.

Mulshi Pattern 2 – चित्रपट निर्माते व अभिनेते प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न 2’ चित्रपट काढण्याची घोषणा केल्यानंतर मुळशी तालुक्यात या चित्रपटाच्या नावाला विरोध सुरू झाला आहे. ‘मुळशी पॅटर्न’मुळे तालुक्याचे नाव देशभर पोहोचले असले तरी त्यातून मुळशीची गुन्हेगारी अशी प्रतिमा निर्माण झाली आणि त्याचा स्थानिकांना सामाजिक व आर्थिक फटका बसल्याचा आरोप मुळशीकरांनी केला.
याच पार्श्वभूमीवर पौड येथील पंचायत समिती सभागृहात मुळशीकरांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत चित्रपटाच्या कथानकाला आमचा विरोध नाही; मात्र मुळशीचे नाव देऊन तालुक्याची बदनामी करू नये, अशी स्पष्ट भूमिका उपस्थितांनी मांडली. ‘मुळशी पॅटर्न 2’ या नावाला तीव्र विरोध करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक एकवटले आहेत.
‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटामुळे मुळशी तालुक्याची गुन्हेगारी स्वरूपाचा तालुका अशी राज्यभर प्रतिमा निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम तालुक्यातील उद्योगधंद्यांवर झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आला. उद्योगांचे स्थलांतर झाल्याने स्थानिक युवक-युवतींच्या रोजगार व व्यवसायाच्या संधी कमी झाल्या.
तसेच तालुक्याच्या प्रतिमेबाबत निर्माण झालेल्या गैरसमजांमुळे युवक-युवतींच्या विवाहाच्या प्रश्नांवरही परिणाम झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. ‘मुळशी पॅटर्न 2’ची घोषणा झाल्यानंतर स्थानिक मुळशीकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, समाजमाध्यमांवर या नावाला विरोध करणार्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.
अस्मिता जपायची असते, विकायची नसते
चित्रपटाच्या नावातून ‘मुळशी’ हे नाव वगळले नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा उपस्थितांनी दिला. तसेच समाजमाध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया नोंदविताना बनावट खात्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. ‘जमीन राखायची असते, विकायची नसते; त्याचप्रमाणे मुळशीची अस्मिताही जपायची असते, विकायची नसते,’ असा सूर बैठकीत उमटला.





